PM Modi : दितवाह चक्रीवादळामुळे मोठे नुकसान, PM मोदींचा श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना फोन, मदतीचे दिले आश्वासन

Cyclone Ditwah : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्याशी फोनवरून संवाद साधत दितवाह चक्रीवादळात जीवित आणि वित्तहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण काळात भारत श्रीलंकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं मोदींनी म्हटले.

PM Modi : दितवाह चक्रीवादळामुळे मोठे नुकसान, PM मोदींचा श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना फोन, मदतीचे दिले आश्वासन
PM Modi Calls Shrilanka President
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 01, 2025 | 10:02 PM

गेल्या काही दिवसांपासून भारताच्या दक्षिणेकडील देश श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळाचा कहर पहायला मिळत आहे. या चक्रीवादळात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्याशी फोनवरून संवाद साधत जीवित आणि वित्तहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण काळात भारत श्रीलंकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि या संकटाच्या वेळी आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे तयार आहोत असे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारताने या संकटाच्या काळात श्रीलंकेला मदत साहित्य पाठवले असून बचाव पथके घटनास्थळी काम करत आहेत. ही मदत भारताची मानवतावादी भूमिकेतून केली जात आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती दिसानायके यांना आश्वासन दिले की सागर बंधू ऑपरेशन अंतर्गत श्रीलंके बचाव आणि मानवतावादी मदत पुरवली जाईल.

राष्ट्रपती दिसानायके यांनी मानले भारताचे आभार

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, भारताच्या त्वरित मदतीमुळे श्रीलंकेच्या बाधित भागात मदत कार्य वेगवान झाले आहे. भारतीय बचाव पथके आणि मदत वेळेवर मिळाल्याने अनेक भागात तात्काळ मदत पोहोचवण्यास मदत झाली. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी भारताचे आभार मानताना भारताच्या या कृतीचे वर्णन मैत्री आणि विश्वासाचे उदाहरण म्हणून केले.

श्रीलंकेला चक्रीवादळाचा तडाखा

दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि समुद्रातील लाटा यामुळे हजारो लोकांना स्थलांतरित करावे लागले आहे. भारताच्या मदत पथकांनी तातडीने किनारी भागात मदतकार्य केले आणि शेकडो लोकांचा जीव वाचवला. भारताने या लोकांसाठी, अन्न, पाणी आणि तात्पुरता निवारा बांधण्यासाठी असणाऱ्या साहित्य समाविष्ट होते.

आगामी काळातही भारत श्रीलंकेला मदत करेल असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती दिसानायके यांना सांगितले की, भारत हिंदी महासागर क्षेत्रातील देशांसोबत सहकार्य आणि मानवतावादी मदतीला प्राधान्य देतो. नैसर्गिक आपत्तींच्या काळात भारत नेहमीच श्रीलंकेचा पहिला मित्र राहिला आहे. आगामी काळातही भारत नेहमी श्रीलंकेला मदत करेल.