
पाकिस्तान सध्या अंतर्गत वादात एवढा अडकला आहे की, त्यांच्या समोरच्या प्रश्नांची मालिका संपता संपत नाहीये. पाकिस्तानवर प्रचंड कर्ज झालं आहे, कर्ज फेडण्यासाठी कंगाल पाकिस्तानकडे पैसे देखील नाहीयेत. तेथील लोकांना नीट दोन वेळेचं अन्न देखील मिळत नाहीये, दहशतवादानं पाकिस्तान आतून पोखरून काढला आहे. त्यातच आता बलुचिस्तानने देखील पाकिस्तानची झोप उडवली आहे, बलूच बंडखोर पाकिस्तान सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पाकिस्तानच्या जेलमध्ये असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी पाकिस्तानचे सेना प्रमुख आसिम मुनीर यांना एक संदेश पाठवला आहे, हा संदेश इमरान खान यांची बहीण आलिमा खान यांनी मुनीर यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. अलिमा यांनी केलेल्या दाव्यानुसार इमरान यांनी मुनीर यांना म्हटलं आहे की, तुम्ही आम्हाला कधीच तोडू शकणार नाहीत, आम्ही कधीच तुमची गुलामी स्वीकारणार नाहीत.
बीबीसी ऊर्दूने आलिमा यांनी आसिम मुनीर यांना जो संदेश दिला आहे तो प्रकाशित केला आहे. या संदेशात इमरान यांनी म्हटलं आहे की, मी तुमचे आभार मानतो कारण तुम्ही एका फारमोठ्या गैरसमजात आहात. तुम्ही सध्या माजी सैन्य प्रमुख याह्या खान यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहात, असं इमरान खान यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानच्या दोन तुकड्यांचा उल्लेख
पुढे या पत्रात असं देखील म्हटलं आहे की, तुम्ही याह्या खान यांच्या सारखं काम करत आहात, पण हे विसरू नका की, याह्या खान यांची सत्ता कशी तरी वाचली, मात्र पाकिस्तानचं दोन तुकड्यांमध्ये विभाजन झालं. तुम्ही आमचा पक्ष पीटीआय संपवला असा आरोपही यावेळी इमरान यांनी केला आहे. तोशखाना प्रकरणात पार पडलेल्या सुनावणीनंतर इमरान खान यांनी हे पत्र आसीम मुनीर यांना पाठवलं आहे. आदियाला जेलमध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली. या प्रकरणात इमरान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यावर आरोप आहेत.
सत्ता बदलाची भविष्यवाणी
दरम्यान पाकिस्तानी पत्राकारांनी केलेल्या दाव्यानुसार इमरान खान यांनी जेलमधूनच लवकरच देशात सत्ता बदल होणार असल्याची भविष्यवाणी देखील केली आहे. देशावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे, महागाई प्रचंड वाढली आहे. लोक परेशान झाले आहेत. पाकिस्तानची परिस्थिती नेपाळ आणि श्रीलंकेसारखी झाली आहे, देशात लवकरच सत्ता परिवर्तन दिसून येईल, असंही यावेळी इमरान यांनी म्हटलं आहे.
इमरान यांचं हे स्टेटमेंट अशा परिस्थितीमध्ये आलं आहे, जेव्हा बलूच बंडखोरांकडून स्वातंत्र्य बलुचिस्तानची मागणी सुरू आहे. बलुचीस्तानमधील परिस्थिती सध्या नियंत्रणाबाहेर असून, तेथील प्रशासनाचं नियंत्रण कोलमडलं आहे. या प्रातांच्या अनेक भागांवर बलूच बंडखोरांचा ताबा आहे, तर दुसरीकडे खैबर प्रांतामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे, तिथे देखील आता उठावाला सुरुवात झाली आहे, या प्रांतात तर इमरान खान यांच्या पक्षाचचं सरकार आहे.