भारताला जबर धक्का! रशियाकडून तेलाबाबत ऐनवेळी अडचणीत टाकणारा निर्णय; दिवाळीच्या तोंडावर…
भारत आपल्या सूर्यफूल तेलाच्या गरजेपैकी मोठा भाग आयातीद्वारे पूर्ण करतो. दर महिन्याला सुमारे 2.5 लाख टन आयातीची गरज असताना, ऑक्टोबरमधील आयात 1.6 लाख टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिका-इराण संघर्ष यामुळे जागतिक पातळीवर अस्थिरता कायम आहे. या संघर्षामुळे भारताला आतापर्यंत मोठा फटका बसलाय. कच्चे तेल तसेच इतर महत्त्वाच्या वस्तूच्या व्यापारावर परिणाम पडलेला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कमी झाल्यानंतर हा व्यापार पूर्ववत झाला आहे. परंतु आता भारताला ऐनवेळी मोठा फटका बसला आहे. असे असतानाच आता रशियाकडून भारतात येणारी 20 हजार टन सूर्यफूल तेलाची खेप रद्द करण्यात आली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्लॅक सी परिसरातील बंदरांच्या पायाभूत सुविधांवर हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमुळे तेलाच्या निर्यातीवर परिणाम झाल्याचे सांगितले जातेय.
20 हजार टन सूर्यफूल तेलाची खेप रद्द
‘इंटरनॅशनल सनफ्लॉवर ऑइल असोसिएशन’चे अध्यक्ष संदीप बजोरिया यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, भारतासाठी रवाना होणारी 20 हजार टन सूर्यफूल तेलाची खेप रद्द करण्यात आली. ब्लॅक सी परिसरातील बंदरांचे नुकसान झाल्याने पुरवठादाराला ही खेप भारतात पोहोचवणे शक्य झाले नाही. सूर्यफूल तेलाच्या व्यापारात अशा प्रकारे खेप रद्द होण्याच्या घटना अत्यंत दुर्मीळ मानल्या जातात. गेल्या अनेक वर्षांत अशा प्रकारची घटना जवळपास पाहायला मिळाली नव्हती.
ब्लॅक सीमार्गे होणारी वाहतूक अडचणीत
दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतासाठी येणाऱ्या आणखी सुमारे 60 हजार टन सूर्यफूल तेलाच्या खेपांना विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ब्लॅक सीमार्गे वाहतूक अडचणीत आल्याने रशियन पुरवठादार आता सेंट पीटर्सबर्ग आणि उस्त-लुगा या बाल्टिक समुद्रातील बंदरांचा पर्याय वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या मार्गामुळे वाहतूक खर्च वाढणार असून भारतात माल पोहोचण्यास सुमारे 10 दिवस अधिक लागू शकतात.
ऑक्टोबरमधील आयात 1.6 लाख टनांपर्यंत घसरणार
भारत आपल्या सूर्यफूल तेलाच्या गरजेपैकी मोठा भाग आयातीद्वारे पूर्ण करतो. दर महिन्याला सुमारे 2.5 लाख टन आयातीची गरज असताना, ऑक्टोबरमधील आयात 1.6 लाख टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळातील वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय खरेदीदार आता पाम ऑइलकडे वळण्याची शक्यता आहे. किंवा भविष्यात सूर्यफूल तेलाचा भाव वाढू शकतो. भारताने अवघ्या तीन दिवसांत नोव्हेंबर आणि डिसेंबरसाठी 1.5 लाख टन कच्च्या पाम ऑइलची खरेदी केली आहे.