
रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात सध्या चिंतेचे वातावरण आहे. अमेरिका हे युद्ध थांबवण्यासाठी रशियावर दबाव टाकत आहे. मात्र आता रशियाने जगाला आपली लष्करी ताकद दाखवली आहे. लष्करी सराव सुरू असताना रशियाने आपल्या खतरनाक शस्त्रांपैकी एक असलेल्या हायपरसोनिक झिरकॉन मिसाईलची चाचणी केली. त्यामुळे अमेरिकेसह नाटो देशांची झोप उडाली आहे. कारण या मिसाईलचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा 9 पट जास्त आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आपल्या तुफान वेगामुळे या मिसाईलला रोखणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे या मिसाईलमध्ये कोणत्याही देशाचा नकाशा बदलण्याची ताकद आहे. रशियाने याबाबत माहिती देताना म्हटले की, ‘ आम्ही बॅरेंट्स समुद्रातील एका टार्गेटवर झिरकॉन (त्सिर्कॉन) हायपरसोनिक क्रूझ मिसाईल डागली. तसेच बेलारूससोबतच्या संयुक्त लष्करी सरावादरम्यान सुखोई एसयू-34 सुपरसोनिक फायटर-बॉम्बर्सनी हल्ले केले.
रशियन संरक्षण मंत्रालयाने बॅरेंट्स समुद्रातील झिरकॉन हायपरसोनिक मिसाईलचे एक फुटेज जारी केले आहे. या फुटेजमध्ये दिसत आहे की हे मिसाईल फ्रिगेटवरून उभ्या दिशेने सोडण्यात आले आणि नंतर ते कोनात क्षितिजाकडे वळले. त्यानंतर या मिसाईलने लक्ष्य नष्ट केले अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
रशियन संरक्षण मंत्रालयाने रशिया आणि बेलारूसच्या संयुक्त सरावाबाबतही माहिती दिली आहे. या सरावाचा उद्देश रशिया किंवा बेलारूसवर हल्ला झाल्यास लष्करातील समन्वय सुधारणे आहे. हा सराव पूर्णपणे बचाव करण्याच्या हेतूने केला जात आहे. या सरावाचा उद्देश कोणत्याही नाटो देशावर हल्ला करण्याचा नाही अशी माहिती दोन्ही देशांनी दिली आहे.
दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 2019 मध्ये झिरकॉन मिसाईल बनवत असल्याची माहिती दिली होती. हे आवाजाच्या वेगापेक्षा 9 पट वेगाने उडू शकते. रशियामध्ये 3M22 झिरकॉन आणि नाटोमध्ये SS-N-33 नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मिसाईलची रेंज 400 ते 1,000 किलोमीटर आहे. तसेच वॉरहेडचे वजन सुमारे 300-400 किलोग्रॅम आहे. त्यामुळे हे मिसाईल एका सेकंदात जगातील कोणत्याही देशाचा नकाशा बिघडवू शकते.