महिलांनो, 7-8 मुलं जन्माला घाला, थेट राष्ट्रपतींचंच जनतेला आवाहन; कारण काय?
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी रशियन महिलांना सात ते आठ मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं आहे. मोठं कुटुंब, अधिक मुलं हीच आपली पंरपरा आहे. आपली आजी आणि पणजीही आठ दहा मुलांना जन्माला घालायची. आपण ही परंपरा विसरून गेलो आहोत. ही परंपरा परत सुरू झाली पाहिजे, असं पुतिन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मॉस्को | 2 डिसेंबर 2023 : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी देशातील महिलांना एक आवाहन केलं आहे. रशियन महिलांनी 7 ते 8 मुलांना जन्माला घालावं, असं आवाहन पुतिन यांनी केलं आहे. त्यासाठी त्यांनी जुन्या काळातील दाखलाही दिला आहे. जुन्या काळात असं होतं होतं. आपली आजी आणि पणजी त्या काळात 7-8 मुलांपेक्षा अधिक मुलांना जन्माला घालायची. महिलांनी ही चांगली परंपरा पुन्हा सुरू केली पाहिजे, असं व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे. मात्र, पाश्चात्य मीडियाचं म्हणणं काही औरच आहे. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने सैनिकांना मारलं जात आहे. त्यामुळेच पुतिन यांनी हे आवाहन केल्याचं पाश्चात्य मीडियाचं म्हणणं आहे.
मॉस्कोमध्ये वर्ल्ड रशियन पिपल्स कौन्सिलचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. राष्ट्रपतींनी अचानक हे आवाहन केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. संयुक्त आणि मोठं कुटुंब हे रशियन लोकांसाठी आदर्श ठऱत आहे. कुटुंब म्हणजे केवळ राज्य आणि समाजाचा पाया नसतो तर ही एक अध्यात्मिक घटना आहे. नैतिकतेचा स्त्रोत आहे. रशियात दशकापासून जन्मदर घटत आहे. त्यामुळे तरुणांच्या संख्येत घट होत आहे, असं पुतिन म्हणाले.
अनेक सैनिक मारले गेले
गेल्या दीड वर्षापासून रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे. या युद्धात रशियाचे लाखो सैनिक मारले गेले आहेत. म्हणूनच पुतिन यांनी हे आवाहन केल्याचं सांगितलं जात आहे. येणारी अनेक दशके रशियनांची लोकसंख्या संरक्षित ठेवण्याचं आमचं लक्ष्य आहे. शाश्वत रशियाच्या भविष्यासाठी आपल्याला हे करायचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नऊ लाख लोकांनी रशिया सोडला
युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे जवळपास नऊ लाख लोकांनी रशिया सोडल्याची माहिती आहे. या लोकांना देश सोडून पळून जावं लागलं आहे. जेव्हा पुतिन यांनी तीन लाख रिझर्व्ह फौज तयार करायला सांगितली तेव्हाच लोकांचं देशांतर अधिक वाढलं. एका मीडिया रिपोर्टनुसार, युक्रेन युद्धात 50 हजार सैनिक मारण्यात आले आहेत. तर ब्रिटिश संरक्षण मंत्रालयाच्या दाव्यानुसार या युद्धात 290,000 रशियन सैनिक मारले गेले आहेत.
वारंवार अपील
व्लादिमीर पुतिन 24 वर्षापूर्वी सत्तेत आले होते. तेव्हापासून ते रशियातील महिलांना वारंवार मुलं जन्माला घालण्याचं आवाहन करत आहेत. एवढेच नव्हे तर एकाहून अधिक मुलं जन्माला घालणाऱ्या कुटुंबाला पुतिन यांनी खर्चही दिला आहे. एवढेच नव्हे तर मोठं कुटुंब असलेल्यांना रशियन सरकारने भूखंड आणि आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, हे आश्वासन अद्याप पूर्ण केलं नाही. पुतिन यांनाच चारहून अधिक मुलं असल्याची अफवा आहे. पण पुतिन मुलांबाबत बोलत नसल्याचंही सांगितलं जात आहे.