
सौदी अरब देशाने मद्यविक्रीवरील बंदी हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या इस्लामिक देशाने ७३ वर्षांनंतर अल्कोहॉलवर लादलेली बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरब देशाने पर्यटन वाढविण्यासाठी आणि साल २०३० मध्ये होणाऱ्या एक्सो आणि २०३४ मध्ये भरणाऱ्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सौदी अरबमध्ये ७३ वर्षानंतर मद्य विक्री होणार आहे. या मुस्लीम देशात मद्यपानास सक्त मनाई होती. परंतू हा निर्णय घेतानाही अनेक अटी आणि शर्ती लागू केलेल्या आहेत. कोणत्या आहेत या शर्ती ते पाहूयात….
सौदी अरबने नाईट लाईफ आणि परदेशी पर्यटकांना ध्यानात घेऊन आपले उत्पन्न वाढविण्यासाठी जरी मद्यविक्रीचा निर्णय घेतलेला असला तरी ही मद्यविक्री काही विभागांपुरतीच मर्यादित असणार आहे. निवडक ६०० जागांवरच मद्यविक्री होणार आहे. यात बहुतांश ठिकाणे आलिशान हॉटेल्स, रिसॉर्ट आणि पर्यटकांसाठी खास पद्धतीने डिझाइन केलेल्या जागेतच मद्यविक्री होणार आहे.
निवडक ठिकाणी दारू जरी विकण्यास मंजूरी दिली असली तरी त्यामध्ये निओम, सिंदालाह बेट आणि रेड सी प्रकल्प यांचा समावेश असू शकतो. पण इथेही सर्व प्रकारचे अल्कोहोल सर्व्ह केले जाणार नाही. या ठिकाणी बिअर, वाईन आणि सायडर उपलब्ध असेल. स्पिरिट्ससारख्या अल्कोहोलची विक्री करण्यास परवानगी नसणार आहे. तसेच, सरकारी घरे, दुकाने किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्यविक्रीला अनुमती असणार नाही आणि तसेच कोणाला स्वत:साठीही मद्य निर्मितीची परवानगी दिली जाणार नाही.
सौदी अरेबियाने त्यांची अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्याची राष्ट्रीय योजना आखली आहे. पर्यटन, मनोरंजन आणि हॉस्पिटॅलिटी यांना प्रोत्साहन देणे हे या निर्णयामागचे उद्दिष्ट आहे. या बदलांमुळे रोजगार निर्मिती चालना मिळेल आणि परदेशी गुंतवणूक येण्यास मदत होईल. मोठ्या हॉटेल चेनमध्ये आधीच त्यांचे नियोजन केले आहे. नियम बदलल्यानंतर अधिक आंतरराष्ट्रीय पाहुणे येतील अशी सौदीच्या अधिकाऱ्यांना आशा आहे. नव्या अल्कोहोल धोरणामुळे सौदी अरेबियाला अधिक जागतिक कार्यक्रम आणि पर्यटकांना आकर्षित करण्यास मदत होऊ शकते असे म्हटले जाते.यात कोणत्याही प्रकारचा गैरवापर किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जाईल असेही सौदीच्या सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.