
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यात भेट झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी असीम मुनीर आणि शहबाज शरीफ यांना बराचवेळ वाट बघावी लागली. महत्वाच्या करारामध्ये डोनाल्ड ट्रम्प व्यस्त असल्याने शरीफ आणि मुनीर यांना ताटकळत थांबावे लागले. शेवटी तिघांची भेट झाली आणि 30 मिनिटे ही बैठक चालली. यादरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. हेच नाही तर काश्मीरच्या मुद्द्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी पाकिस्तान अमेरिकेकडे आग्र करत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काश्मीरचा गेम करण्याची तयारी पाकिस्तानची आहे. मात्र, काश्मीरच्या मुद्द्यामध्ये भारत हा कोणाचीही मध्यस्थी सहन करणार नसल्याचे अगोदरच भारताने स्पष्ट केले.
आता मुनीर, शरीफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील बैठकीबद्दल अत्यंत मोठा खुलासा झाला. शिकागो विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक पॉल पोस्ट यांनी अमेरिका आणि पाकिस्तानमधील वाढत्या संबंधांबाबत एक अत्यंत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले की, अमेरिका पाकिस्तानशी आपले संबंध अधिक दृढ करत आहे, त्याचे कारणही तितकेच मोठे आहे. अमेरिकेला आपली ताकद वाढवायची आहे. त्यासाठी त्यांना पाकिस्तान हवा आहे.
अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट पाकिस्तानद्वारे चीन आणि इराणसारख्या शत्रूंच्या जवळ आपले सैन्य पोहोचवणे आहे. पाकिस्तानला हाताशी धरूनच हे शक्य असल्याचे अमेरिकेला माहिती आहे. पाकिस्तान एक महत्त्वाचा प्रवेशद्वार म्हणून काम करतो, जो वेळ आल्यावर अमेरिकेला या दोन्ही देशांना धडा शिकवण्यास मदत करू शकतो. यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानलासोबत ठेवणे अमेरिकेची मजबुरी आहे.
यासोबत मागच्या काही दिवसांपासून भारत, चीन आणि रशियाची मैत्री अधिक वाढली आहे. भारत आणि चीनमध्ये काही गोष्टींवरून वाद असताना देखील अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर चीन हा भारताच्या बाजूने थांबला. हेच नाही तर यादरम्यानच्या काळात त्यांनी काही महत्वाचे करार हे देखील भारतासोबत केले. चीन आणि भारताची वाढती जवळीकता अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरलीये.