
कोलंबो : श्रीलंका (Sri Lanka) सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. महागाई (Inflation) गगनाला भिडली आहे. भाजीपाल्यापासून ते अन्नधान्यापर्यंतच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. पेट्रोल (Petrol), डिझेलचा प्रचंड तुटवडा आहे. काही केल्या परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने आता तेथील नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घालताच राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती भवनातून पलायन केले. याबाबत मीडिया रिपोर्टमधून माहिती समोर येत आहे. दरम्यान 11 मे रोजी तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी देखील कोलंबोमधून आपल्या कुटुंबासोबत पलायन केले होते. आंदोलकांनी त्यांच्या कोलंबोमधील निवासस्थानाला घेराव घातला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून महिंदा राजपक्षे हे आपल्या कुटुंबासह निवासस्थानातून बाहेर पडले होते.
समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे आज दुपारी आंदोलकांनी कोलंबोमध्ये असलेल्या राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. घेराव घातल्यानंतर आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाची तोडफोड सुरू केली. सध्या श्रीलंकेमध्ये आर्थिक संकट गंभीर बनले आहे. या आर्थिक संकटाला राजपक्षे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलक करत आहेत. मात्र अद्यापही राजीनामा न दिल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. आज आंदोलकांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनला घेराव घातला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून गोटबाया राजपक्षे यांनी आपल्या निवासस्थानातून पलायन केले. विशेष म्हणजे शुक्रवारपासूनच श्रीलंकेत अघोषित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला आहे. मात्र तरी देखील हे आंदोलक कोलंबोमध्ये पोहोचले.
श्रीलंका सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. महागाईचा भडका उडाला आहे. आयात करण्यासाठी सरकारकडे पुरेशे विदेशी चलन नसल्याने देशात अनेक गोष्टींचा तुटवडा आहे. पेट्रोल, डिझेलसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहे. या सर्व परिस्थितीला राजपक्षे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप श्रीलंकेमधील नागरिकांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. मात्र राजीनामा न दिल्याने आंदोलक आक्रमक झाले. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारपासूनच श्रीलंकेत कफ्यूची घोषणा करण्यात आली आहे. कोलंबोमध्ये मोठा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र तरी देखील ही संरक्षण यंत्रणा भेदत नागरिक राष्ट्रपती भवनात पोहोचले.