
Bangladesh Student Shot : बांगलादेशमध्ये सध्या पुन्हा एकदा हिंसक आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. सध्या तिथे अस्थिरतेचे वातावरण असतानाच विद्यार्थी नेत्याला घालण्यात आल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे आता बांगलादेशातील परिस्थिती जास्तच बिघडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोळी घालण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव मोतालेब सिकदर असे आहे. त्याच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या असून तो गंभीर जखमी आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी बांगलादेशची राजधानी ढाका येथे शरीफ उस्मान हादी नावाच्या एका विद्यार्थी नेत्याचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्यानंतर आता मोतालेब सिकदर या तरुण विद्यार्थी नेत्यालाही गोळ्या घालण्यात आल्या आहेत.
बांगलादेशातील स्थानिक वृत्तसंकेतस्थळ द डेली स्टारने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार दक्षिण-पश्चीम बांगलादशातील खुलना शहरात मोतालेब सिकदर यांच्यावर गोळ्या घालण्यात आल्या आहेत. गोळ्या घातल्यानंतर त्यांना तत्काळ खुलना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केले आहेत. जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले.
मोतालेब सिकदर हे नॅशनल सिटिझन पार्टीचे नेते आहेत. या पार्टीचे नेते हसनत अब्दुल्ला यांनी नुकतेच भारताविरोधात विधान केले होते. पक्षाने दिलेल्या माहितीनुसार सिकदर हे खुलना डिव्हिजनचे प्रमुख आहे. ते पक्षाच्या वर्कर्स फ्रंटचे केंद्रीय प्रमुखही आहेत.
सिकदर हे 42 वर्षांचे आहेत. 2004 साली एका हिंसक विद्यार्थी आंदोलनाचे त्यांनी नेतृत्त्व केले होते. ते मुळचे खुलना येथील सोनाडांगा भागातील शेखपाडा पल्ली येथील रहिवासी आहेत. सकळी 11.45 वाजता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. सिकदर यांना जीवे मारण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आला होता. आता या प्रकरणात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.