आत्मघाती हल्ल्याने पाकिस्तान हादरलं, 13 सैनिकांचा मृत्यू, 10 जण जखमी

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 13 सैनिक ठार झाले आहेत. तसेच या हल्ल्यात 10 सैनिक गंभीर जखमी झाले आहेत.

आत्मघाती हल्ल्याने पाकिस्तान हादरलं, 13 सैनिकांचा मृत्यू, 10 जण जखमी
suicide bomb attack in Pakistan (File Photo)
| Updated on: Jun 28, 2025 | 3:49 PM

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 13 सैनिक ठार झाले आहेत. तसेच या हल्ल्यात 10 सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या हल्ल्यात 19 नागरिकही जखमी झाले आहेत. या हल्ल्याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘एका हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन लष्करी ताफ्यावर आदळवले, त्यामुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटात 13 सैनिकांचा मृत्यू झाला असीन 10 सैनिक आणि 19 नागरिक जखमी झाले आहेत, त्याचबरोबर काही घरांचेही नुकसान झाले आहे.

या हल्ल्याबाबत एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटात 2 घरांचे छप्परही कोसळले आहेत, यामुळे 6 मुले जखमी झाली आहेत. आतापर्यंत कोणीही या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या आधी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने या भागात अनेकदा हल्ले केले होते अशी माहितीही समोर आली आहे.

खैबर पख्तूनख्वा भागात दहशतवादी हल्ले वाढले

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. खासतरून खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये हे हल्ले होत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांची चिंता वाढली आहे. या वर्षी मार्चमध्ये पाकिस्तानी सैन्याने असा दावा केला होता की, आम्ही टीटीपीशी संबंधित 10 संशयित दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दक्षिण वझिरिस्तानमधील फ्रंटियर कॉर्प्स कॅम्पवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने ही कारवाई केली होती.

पाकिस्तानी सैन्यावर अनेकदा हल्ले

पाकिस्तानी सैन्यावर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या हल्ल्यात 16 पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते, तर 8 जखमी झाले होते. हा हल्ला अफगाणिस्तान सीमेजवळ झाला होता. जानेवारीमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने केचमध्ये 35 हल्ले केले होते. याता 94 सैनिकांचा मृत्यू झाला होता. तर जूनमध्ये बलुच सैन्याने ग्वादरमधील सयाबादवर हल्ला केला होता, ज्यामध्ये 16 सैनिक ठार झाले होते. त्यामुळे आता पाकिस्तान सरकारची चिंता वाढली आहे.