Sunita Williams : चिंता वाढली… सुनीता विल्यम्स अंतराळात फसली, मोठा निर्णय घ्यावा लागणार, फक्त काही दिवस…
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर आणण्यासाठी स्टारलाइनरचा वापर केला जाऊ शकतो. पण त्याची रिस्क आहे. त्यामुळे नासा जुलैच्या अखेरीस केलेल्या परीक्षणाच्या डेटाचा अभ्यास करत आहे. सोबत इंजीनिअरची टीमही स्टारलाइनर विमानातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, असं नासाचे अधिकारी बोवरसॉक्स यांनी सांगितलं.

अंतराळ प्रवासी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळातून परत कधी येणार यावर नासाने मोठी अपडेट दिली आहे. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर दोघेही अंतराळात फसले आहेत. त्यांना बोइंग स्टारलाइनरने खाली आणायचं की स्पेसएक्सच्या विमानाने आणायचं याचा निर्णय ऑगस्टच्या अखेरीपर्यंत घेण्यात येणार असल्याचं नासाने म्हटलं आहे. म्हणजे सुनीता विल्यम्स आणि विल्मोर हे दोघेही सप्टेंबरपर्यंत पृथ्वीवर येऊ शकतात. पण हा निर्णय घेतला तरच ते शक्य आहे. त्यामुळेच जगभराची चिंता वाढली आहे.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 5 जून रोजी बोइंगच्या स्टारलाइनर विमानाने अंतराळातील स्पेस स्टेशनला गेले होते. ही एक टेस्टिंग फ्लाइट होती. तर मिशन 8 दिवसात होणार होतं. परंतु, या फ्लाइटमध्ये टेक्निकल बिघाड झाल्याने दोघेही अंतराळातच अडकून पडले आहेत. त्यांना अद्यापपर्यंत आणण्यात आलं नाही.
ऑगस्ट अखेरीस निर्णय
दरम्यान, नासाने बुधवारी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली. आम्ही अजून थ्रस्टर डेटाचं विश्लेषण करत आहोत. पण सुनीता आणि विल्मोरला आणण्यासाठी स्टारलाइनरचा वापर करायचा की बोइंगच्या स्पेसएक्स विमानाचा वापर करायचा याचा निर्णय अद्याप झालेला नाही, असं नासाने म्हटलं आहे. आम्ही ऑगस्टच्या अखेरीपर्यंत याबाबतचा निर्णय घेऊ. त्यानंतर या दोघांना पृथ्वीवर आणलं जाईल, असं नासाचे अधिकारी बोवरसॉक्स यांनी सांगितलं.
सुनीता आणि विल्मोर अंतराळात चांगला वेळ घालवत आहेत. त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी जो निर्णय घेण्यात येणार आहे, तो जाणून घेण्यासाठी ते दोघेही उत्सुक असतील याची मला खात्री आहे. तशी उत्सुकता आम्हा सर्वांनाही आहे, असंही बोवरसॉक्स यांनी सांगितलं.
पुढच्यावर्षी येणार
बोइंगसोबत आमची चांगली चर्चा झाली आहे. त्यांना त्यांच्या स्टारलाइनर विमानावर 100 टक्के विश्वास आहे. दोघाही अंतराळवीरांना सुरक्षित आणण्यात यावं हाच नासाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आम्ही कोणतीही रिस्क घेत नाही, असंही त्यांनी सांगितलं. याच कारणामुळे स्पेस एजन्सी नासा ही स्टारलाइनर शिवाय इतर स्पेसएक्सच्या विमानाने दोघांना परत आणण्यासाठीही विचार करत आहे. जर असं झालं तर 24 सप्टेंबर रोजी क्रू9 मिशनला 4 ऐवजी दोन अंतराळवीरांसोबत लॉन्च केलं जाईल. या परिस्थिती स्पेस स्टेशनवर असलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर क्रू9 मिशनचा भाग होतील. ते स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून फेब्रुवारी 2025मध्ये परत येतील.
सुनीता आणि विल्मोर यांनी या मिशनसाठी आधीच तयारी केली होती. ही एक टेस्ट फ्लाइट असून यावेळी काही अडचणी येऊ शकतात याची या दोघांना कल्पना होती. या मिशनचे कमांडर विल्मोर यांनी स्टारलाइनर मिशनच्या आधी अंतराळात 178 दिवस घालवलेले आहेत. तर बोइंग मिशनची पायलट सुनीताने सुमारे 322 दिवस अंतराळात घालवले आहेत. दोघांनाही अंतराळात दीर्घकाळ राहण्याचा अनुभव आहे. दोघेही प्रोफेशनल आहेत आणि ते चांगलं काम करत आहेत, असं नासाचे चीफ अॅस्ट्रोनॉट जो अकाबा यांनी सांगितलं.
