Nepal PM: नेपाळची सुत्रे आता महिलेच्या हाती, सुशीला कार्की यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ

नेपाळच्या नवीन अंतरिम पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रपती पौडेल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पुढील निवडणुकांपर्यंत सुशीला कार्की देशाचे नेतृत्व करणार आहेत.

Nepal PM: नेपाळची सुत्रे आता महिलेच्या हाती, सुशीला कार्की यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ
sushila-karki
Updated on: Sep 12, 2025 | 9:57 PM

नेपाळच्या नवीन अंतरिम पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रपती पौडेल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पुढील निवडणुकांपर्यंत सुशीला कार्की देशाचे नेतृत्व करणार आहेत. या निवडणुका पुढील सहा महिन्यांत किंवा एका वर्षात होऊ शकतात. सुशीला कार्की या नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश आहेत, आता त्यांच्यावर देश चालवण्याची जबाबदारी असणार आहे.

सुशीला कार्की यांना अंतरिम पंतप्रधान बनवण्याबाबत आंदोलकांमध्ये एकमत झाले होते. त्यामुळे त्यांच्याकडे नेपाळच्या पंतप्रधानपदाची सुत्रे दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता त्यांनी नेपाळचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. त्या नेपाळच्या पहिला महिला पंतप्रधान आहेत. त्यांच्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कोण आहेत सुशीला कार्की?

73 वर्षांच्या सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. सोबतच त्या चीफ जस्टिस देखील होत्या, सुशीला कार्की या एक वर्ष नेपाळच्या चीफ जस्टिस होत्या, 30 एप्रिल 2017 रोजी त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला, प्रस्ताव मंजूर झाल्यानं त्यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं. सुशीला कार्की यांना एकूण सात भावंड असून, कार्की या त्यापैकी सर्वात मोठ्या आहेत. त्यांनी आपलं बहुतांश शिक्षण हे भारतामधील बनारस हिंदू विद्यापीठातून पूर्ण केलं आहे, त्यांनी नेपाळमध्ये अनेक वर्ष वकिली देखील केली.  आता त्या नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या आहेत. 

ही नावेही होती चर्चेत

सुशीला कार्की यांच्या आधी पंतप्रधानपदासाठी बालेन शाह यांचे नावही पुढे आले होते. 35 वर्षीय बालेन सध्या काठमांडूचे महापौर आहेत. ते सुरुवातीला रॅपर होते, नंतर ते राजकारणात आले. तसेच अंतरिम पंतप्रधान म्हणून कुलमान घिसिंग यांचे नावही चर्चेत आले होते. घिसिंग हे नेपाळ वीज प्राधिकरणाचे माजी प्रमुख आहेत.

या कारणामुळे नेपाळचे सरकार कोसळले

युवकांच्या आंदोलनामुळे नेपाळमधील सरकार कोसळले होते. सरकारने सोशल मीडियावर बंदी आणली होती, तसेच देशातील भ्रष्टाचार शिगेला पोहोचला होता. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले होते. काही दिवसांपूर्वी आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला होता, त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त आंदोलकांनी संसद भवनासह अनेक मंत्र्यांची घरे पेटवली होती. त्यामुळे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी राजीनामा दिला आणि ते परदेशात पसार झाले. त्यानंतर आता कार्की यांच्याकडे देशाची सुत्रे देण्यात आली आहेत.