
इराणवर इस्राईल आणि अमेरिकेने हल्ला केल्यानंतर जगात इंधनाची टंचाई सुरु झाली आहे. या युद्धाला आज २१ दिवस पूर्ण होत आहेत. या युद्धात अमेरिकेवर अनेक राष्ट्रांनी टीका केली आहे, अमेरिकेतूनही या युद्धाला विरोध आहे. मात्र आता अमेरिकेचा जवळचा सहकारी असलेल्या एका देशाने आता त्याची साथ सोडली आहे. युरोपियन देश स्वित्झर्लंडने म्हटले आहे जर अमेरिका इराणवरील हल्ले थांबवणार नसेल तर अमेरिकेला शस्रास्रे निर्यात करण्यासाठी कंपन्यांना तो लायसन्स देणार नाही.
रॉयटर वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार स्वित्झर्लंडने म्हटले आहे की तो कोणत्याही प्रकारे युद्धाला प्रोत्साहन देणार नाही आणि तटस्थ आहे. त्यामुळे अमेरिकेला शस्रास्रांची निर्यात जारी करणार नाही.
स्वित्झर्लंड सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की इराणसोबत सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय संघर्षात सामील देशांना युद्ध सामग्री निर्यातीची परवानगी संघर्ष सुरु असेपर्यंत दिला जाणार नाही. सध्या अमेरिकेला युद्ध सामुग्रीच्या निर्यातीची अनुमती दिली जाणार नाही.
अमेरिका आणि इस्राईल यांनी इराणवर हल्ले केल्यानंतर जागतिक तेल पुरवठ्याचा महत्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ स्ट्रेटला बंद केले आहे. या होर्मुज स्ट्रेटला बंद केल्यानंतर जगातील तेल पुरवठा बाधित झाला आहे. कारण मध्य-पूर्वेतील देश होर्मुझद्वारे त्यांचे तेल विकतात. होर्मुज स्ट्रेट बंद झाल्याने इंधनात टंचाई झाली आहे. तेल आणि गॅसच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. होर्मुझद्वारे जगातील २० टक्के तेलाची वाहतूक होत असते.
इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या युरोपियन सहकाऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले आहे. मात्र, त्यांच्या मदतीला कोणत्याही देशाने होकार दिलेला नाही.
ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड आणि जपान या देशांनी अलिकडे होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक सुरु करण्यासाठी काही योजना असेल तर आपण मदत करायला तयार आहोत असे म्हटले होते. मात्र, जर्मनी आणि नेदरलँड यांनी नंतर साफ मनाई करत या मोहिमेचा भाग होण्यास नकार दिला होता. दोन्ही देशांनी म्हटले की जोपर्यंत युद्धविराम होत नाही. किंवा किमान संघर्ष थांबत नाही तोपर्यंत ट्रम्प यांच्या योजनेत सहभागी होणार नाही असे त्यांनी निष्क्षून सांगितले होते.