रशियाची साथ देणे भारताला पडू शकते महागात, वेनेजुएलाच्या तेलामुळे वाढला तणाव, डोनाल्ड ट्रम्प थेट…
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचा भारतावर मोठा दबाव आहे. हेच नाही तर 50 टक्के टॅरिफ भारतावर अमेरिकेने लावला. पुन्हा एकदा तेलाचा मुद्दा तापताना दिसू शकतो.

अमेरिकेने वेनेजुएलावर हल्ला करत त्यांच्या तेलावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. आता वेनेजुएलाचे तेल अमेरिका जगभरात विकणार आहे. भारताने वेनेजुएलाचे तेल खरेदी करावे याकरिता अमेरिका आग्रही आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता अगोदरच अमेरिकेचा भारतावर मोठा दबाव राहिला. मात्र, भारताने स्पष्ट केले की, आमच्या जनतेच्या हितासाठी असलेले निर्णय आम्ही घेणार. चीननंतर रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा देश भारताच आहे. दिवसेंदिवस भारतात तेलाची मागणी प्रचंड वाढताना दिसत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला असून अजून 500 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी भारत, चीन आणि ब्राझीलला अमेरिकेने दिसली. रशियाकडून तेल खरेदी बंद करून भारताने त्यांच्या ऊर्जा मागणी पूर्ण करण्याची वेनेजुएलाकडून तेल खरेदी करावे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
अमेरिकेने काही तेल कंपन्यांसोबत महत्वाची बैठक घेतली असून वेनेजुएलाच्या तेलाची जाहिरातही अमेरिकेकडून केली जाईल. मात्र, भारत वेनेजुएलाकडून तेल खरेदी करण्याचा विचार करत नसल्याचे सांगितले जात आहे. मुळात म्हणजे रशिया भारताला प्रचंड कमी किंमतीत त्यांचे तेल विकतो. शिवाय खर्चाचा विचार केला तरीही वेनेजुएलाचे तेल घेणे भारताला नक्कीच परवडणारे नाहीये.
वाहतुकीचा खर्च विचारात घेतल्यानंतर वेनेजुएलाचे कच्चे तेल रिलायन्ससाठी मध्य पूर्वेकडील पुरवठ्यापेक्षा अधिक महाग पडेल. ही तेल खरेदी ट्रम्प प्रशासनाला एक राजकीय संदेश देण्यासाठी आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी अमेरिकेमार्फत वेनेजुएलाचे तेल खरेदी करत असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. मात्र, ते अधिक खर्चित होण्याची शक्यता आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज अगोदर रशियाकडूनच तेल खरेदी करत होती. मात्र, अमेरिकेच्या दबावनंतर भारतातील अनेक कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी कमी केली. मात्र, भारतासाठी वेनेजुएलाचे तेल खरेदी करणे महागडे ठरू शकते. यामुळे देशातील तेलाच्या किंमतीही मोठी वाढ होऊ शकतो. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा कितीही दबाव भारतावर तेल खरेदीसाठी असला तरीही भारत तेल खरेदी करणार नसल्याचे कळतंय. हा एकप्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्काच म्हणावा लागेल.
