
भारतासह जगातील अनेक देशांना दहशतवाद्यांपासून धोका आहे. आता पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो देशात लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सुमारे 50 सैनिक ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जमात नसर अल-इस्लाम वाल-मुस्लिमीन (JNIM) या दहशतवादी गटाने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. बोल्सा प्रांतातील डार्गो येथे हा हल्ला झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार जमात नसर अल-इस्लाम वाल-मुस्लिमीन या दहशतवादी संघटनेने बुर्किना फासो देशाच्या उत्तरेकडील भागातील बोल्सा प्रांतातील डार्गो येथील लष्करी तळावर हल्ला केला. या हल्ल्यात 100 दहशतवादी सहभागी झाले होते. या दहशतवाद्यांनी तळावर हल्ला करत जाळपोळ केली, यात तब्बल 50 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच तळाचेही मोठे नुकसान झाले आहे.
JNIM वर संशय
JNIM ने पश्चिम आफ्रिकेतील या देशात अनेक हल्ले केले आहेत. यात आतापर्यंत शेकडो नागरिक आणि लष्करी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बुर्किना फासोच्या राजधानीबाहेर बऱ्याच भागावर JNIM चे नियंत्रण आहे. त्यामुळे आता या दहशतवादी संघटनेकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.
बुर्किना फासोमध्ये खराब सुरक्षा व्यवस्थेमुळे राजकारण अस्थिर झाले आहे. लष्कराची पुनर्रचना करूनही लष्करी नेते इब्राहिम त्राओर इस्लामी हे दहशतवादावर आळा घालण्यात अपयशी ठरले आहेत. अशीच परिस्थिती पुढेही कायम राहिल्यास हल्ले आणखी वाढण्याची शक्यता आहे.
इराणमध्येही दहशतवादी हल्ला
काही दिवसांपूर्वी इराणमध्येही दहशतवादी हल्ला झाला होता. इराणचा दक्षिण-पूर्व प्रांत बलुचिस्तानची राजधानी जाहेदानमधील न्यायालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 13 नागरिक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली होती.
दहशतवाद्यांचा शोध सुरु
इराणमधील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या 13 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या इराणी अधिकारी हा हल्ला कुणी केला? का केला? यामागे कुणाचा हात आहे याचा शोध घेत आहेत. इराणचा हा भाग पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर आहे. याआधीही या भागात असे हल्ले झालेले आहेत. आता पुन्हा एकदा असा हल्ला करण्यात आला आहे.