अणुकरार करा, अन्यथा…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला मोठी धमकी

अमेरिका आणि इराणमधील अणुकराराला विलंब होत असताना, इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला मोठी धमकी दिली आहे.

अणुकरार करा, अन्यथा..., डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला मोठी धमकी
Donald Trump
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 13, 2025 | 6:54 PM

मध्य पूर्व आशियात युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराणमधील अणुकराराला विलंब होत असताना, इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला. इस्रायलने पहाटे इराणचे ४ अणु आणि २ लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. या हल्ल्यात अनेक इराणी लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला मोठी धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणनेही बदला घेण्याची घोषणा केली आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुकराराबद्दल मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांनी इराणला सांगितले की, ‘इस्रायलकडे अनेक धोकादायक शस्त्रे आहेत. इराणमध्ये कराराला विरोध करणारे सर्व मारले गेले. इराणकडे अजूनही संधी आहे. आता करार करा नाहीतर अन्यथा आणखी विनाश होईल.’

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘मी इराणला करार करण्यासाठी अनेक संधी दिल्या आहेत. मी इराणला कडक शब्दात सांगितले आहे की, फक्त करार करा पण हा करार होऊ शकला नाही. मी असेही म्हटले आहे की अमेरिका जगातील सर्वोत्तम आणि सर्वात घातक लष्करी उपकरणे बनवते आणि इस्रायलकडे त्याचा मोठा साठा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इराणला त्याची गरज असेल.

भविष्यात आणखी हल्ले होतील

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘काही इराणी कट्टरपंथी लोक कराराला विरोध करत होते, कारण त्यांना काय होणार आहे हे माहित नव्हते. ते सर्व आता मेले आहेत आणि पुढे जे घडेल ते आणखी वाईट होईल. आधीच खूप मृत्यू आणि विनाश झाला आहे. आता भविष्यात पुढे आणखी नियोजित हल्ले होतील, जे खूप प्राणघातक असतील.’

अणु आणि लष्करी तळांवर हल्ले

इस्रायलने शुक्रवारी इराणच्या अणु आणि लष्करी तळांना लक्ष्य केले. इराकशी झालेल्या युद्धानंतर इराणवर हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. इराणमधील नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी हल्ल्यानंतर सांगितले की, ‘इस्रायलला यासाठी कठोर शिक्षा दिली जाईल.’ इस्रायली हल्ल्यात रेव्होल्यूशनरी गार्डचे प्रमुख जनरल हुसेन सलामी यांचे निधन झाले आहे. तसेच इराणचे सशस्त्र दल प्रमुख जनरल मोहम्मद बघेरी यांचाही मृत्यू झाला आहे.