
पाकिस्तान सोबत मैत्रीच्या नादात तुर्कीने मोठी चूक केली आहे. इंस्ताबुलच्या बैठकीत तुर्कीने तालिबानला इस्लामच्या मुद्यावरुन भरपूर सुनावलं. तुर्कीच्या या कृतीमुळे तालिबान नाराज होऊ शकतो. असं झाल्यास त्याचा थेट फटका पाकिस्तानला बसेल. इंस्ताबुल येथील एका बैठकीत तुर्कीने म्हटलं की, “अफगाणिस्तानात दहशतवादी पाळले जात आहेत. हे बरोबर नाही” खासबाब म्हणजे तुर्कीने हाच आरोप पाकिस्तानवर केला नाही. तुर्कीने अफगाणिस्तानकडे हा दहशतवाद तात्काळ संपवण्याची मागणी केली.
अफगाणिस्तानने हिंसाचाराचा मार्ग सोडून असं सरकार बनवलं पाहिजे, जे लोकशाहीला धरुन असेल, असं तुर्कीने म्हटलं. महिलांवर होणाऱ्या अत्याचारावरुनही तुर्कीने तालिबानची निंदा केली. इंस्ताबुलने तालिबान विरुद्ध अशावेळी टिप्पणी केली आहे, जेव्हा पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ अंकारा दौऱ्यावर आहेत. आता यावर तालिबानकडून काय प्रतिक्रिया येते, याची प्रतिक्षा आहे.
पाकिस्तानचा पुढचा मार्ग खडतर
अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आहे. तालिबान कट्टरपंथीय शासक म्हणून ओळखले जातात. अफगाणिस्तानात महिलांवर अनेक निर्बंध आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतल्यानंतर 2021 साली तालिबानने अफगाणिस्तानची पुन्हा सत्ता मिळवली. कट्टरपंथीय धोरणांमुळेच जगभरात तालिबानची चर्चा होते. म्हणूनच मागच्या चार वर्षात कुठल्याही देशाने तालिबानच्या राजवटीला मान्यता दिलेली नाही. पाकिस्तान तालिबानसोबत पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी पाकिस्तान चीनची मदत घेत आहे. आता तुर्कीने ज्या पद्धतीने तालिबानवर टीका केलीय, त्यामुळे पाकिस्तानचा पुढचा मार्ग खडतर आहे.