
पाकिस्तानी नौदलाने आपल्या दुसऱ्या मिल्गेम पीएनएस खैबर युद्धनौकेला कमीशन केलय. तुर्कीच्या इस्तांबुल येथील नेवल शिपयार्ड मध्ये या युद्धनौकेची बांधणी करण्यात आली आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप एर्दोगन या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. पाकिस्तानी नौदलाचे चीफ ऑफ नेवल स्टाफ एडमिरल नवेद अशरफ सुद्धा यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपती एर्दोगन यांनी आपल्या भाषणात पाकिस्तान आणि तुर्कीमधील बंधुत्वाच्या नात्याचा दाखला दिला. भविष्यात संरक्षण उत्पादन क्षेत्रात अधिक सहकार्य वाढवणार असल्याचं म्हटलं. एडमिरल नवेद अशरफ यांनी एम/एस अस्फात, इस्तांबुल नेवल शिपयार्ड आणि मूळ उपकरण निर्माता OEM चं कौतुक केलं. OEM पीएन मिल्गेम जहाजांची योजना, डिजाइनमध्ये सहभगी आहे. त्यांनी पाकिस्तान आणि तुर्कीमधील वाढत्या संरक्षण भागीदारीचं कौतुक केलं.
राष्ट्रपती एर्दोगन यांनी पीएनएस खैबरचा दौरा केला. त्यांना तिथे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. ते जहाजाच्या क्रू सदस्यांसोबत बोलले. राष्ट्रपति एर्दोआन आणि एडमिरल अशरफ यांनी क्षेत्रीय समुद्री सुरक्षेबद्दल चर्चा केली. भविष्यात पाकिस्तान नेवी तसचं तुर्की नेवल फोर्सेसच्या (टीएनएफ) संयुक्त प्रयत्नांबद्दल चर्चा केली. 2018 साली पाकिस्तान संरक्षण उत्पादन मंत्रालय आणि तुर्कीच्या एम/एस अस्फात कंपनीमध्ये चार मिल्गेम क्लास जहाजांचा निर्माण करार झालेला. या करारातंर्गत दोन जहाजं तुर्कीमध्ये बनवण्यात आली. अन्य दोन जहाजं पाकिस्तानच्या कराची शिपयार्डमध्ये तुर्कीच्या सहकार्याने बनवण्याचं काम सुरु आहे.
पीएनएस बाबरचा आधीच समावेश
पीएनएस खैबरचं कमिशनिंग हे तुर्कीमध्ये दोन जहाजांच्या निर्माणाच्या समाप्तीचं प्रतीक आहे. पहिलं जहाज पीएनएस बाबर याचा पाकिस्तानी नौदलात आधीच समावेश झाला आहे. अन्य दोन जहाजं पीएनएस बेदर आणि पीएनएस तारिक हे 2026 आणि 2027 पर्यंत दाखल होतील असा अंदाज आहे.
हे बहु-उद्देशीय कोर्वेट
पीएन मिल्गेम क्लास जहाज पाकिस्तान नौदलात दाखल झालेली अत्याधुनिक युद्धनौका आहे. हे जहाज आधुनिक कमांड अँड कंट्रोल सिस्टिम, अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि एडवांस्ड सेंसर्सनी सज्ज आहे. हे बहु-उद्देशीय कोर्वेट आहे. जे अँटी-सबमरीन वॉरफेयर, एअर डिफेंस आणि सर्फेस वारफेअरमध्ये सक्षम आहे. पाकिस्तान राष्ट्रपती आसिफ अली जरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पीएनएस खैबरच्या कमीशनिंगबद्दल पाकिस्तानी नेवीला शुभेच्छा दिल्या आहेत.