ट्रम्प यांचा इतका अपमान कोणीच केला नसेल ! स्वत:च्याच देशात निघाली इज्जत, भरसभेत..

हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीच्या बैठकीत अमेरिकन काँग्रेस सदस्या सारा जेकब्स यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल केलेल्या विधानाने खळबळ माजली. लोकांनी खचाखच भरलेल्या सभागृहात त्यांनी थेट असा सवाल विचारला की सगळेच अवाक् झाले.

ट्रम्प यांचा इतका अपमान कोणीच केला नसेल ! स्वत:च्याच देशात निघाली इज्जत, भरसभेत..
Image Credit source: social media
| Updated on: Apr 30, 2026 | 12:06 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा काही नेम नाही. ते कधी काय बोलतील, अचानक घोषणा करतील किंवा जगाला हादरवणारे निर्णय घेतील, याबाबत काहीच सांगता येत नाही. त्यांच्या विधानांच खुद्द देशातील नागरिकही धसका घेतात,त्यांच्याच देशातून त्यांना अनेकदा विरोधाचा सामनाही करावा लागतो. त्यातच आता खुद्द अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी आली आहे. आपल्या देशातच ट्रम्प यांच्याबद्दल जे विधान करण्यात आलं, त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, कित्येक जण अवाक् झाले.

मानसिक स्थिती ठीक आहे का ?

अमेरिकेतील एका महिला डेमोक्रॅटिक काँग्रेस सदस्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एवढंच नव्हे तर तिने ट्रम्प यांच्या मानसिक स्थितीबद्दल चिंताही व्यक्त केली. हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीच्या बैठकीदरम्यान, सॅन दिएगोच्या डेमोक्रॅट सारा जेकब्स यांनी संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांना विचारलेल्या प्रश्नाने सगळेच आश्चर्यचकित झाले. डोनाल्ड ट्रम्प हे कमांडर इन चीफ पद भूषवण्यासाठी मानसिकदृष्ट्या पुरेसे स्थिर आहेत का ? असा थेट सवाल सारा यांनी भर सभेत विचारला.

मात्र त्या प्रश्नावर हेगसेथ यांनी नाराजी व्यक्त केली. हा राष्ट्राध्यक्षांचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं. “तुम्ही जो बायडेन यांना हाच प्रश्न चार वर्षे विचारला का?” असा उलट सवाल हेगसेथ यांनी जेकब्स यांना विचारला. त्यावर जेकब्स यांनीही पलटवार करत प्रत्युत्तर दिलं. “जो बायडेन राष्ट्राध्यक्ष नाहीत. गेल्या दीड वर्षापासून ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आहेत.” असं त्या म्हणाल्या. त्यानंतर जेकब्स यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अनेक जुन्या ट्विट्सचा संदर्भ दिला, विशेषतः त्यांना येशू ख्रिस्ताच्या रूपात दर्शवणाऱ्या एका एआय-निर्मित मीमचा संदर्भही त्यांनी यावेळी दिला.

हेगसेथकडून ट्रम्प यांचा बचाव

हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीच्या बैठकीत जेकब्स आणि हेगसेथ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. हेगसेथ यांनी ट्रम्प यांचा बचाव करत, ते सर्वात गतिमान आणि दूरदर्शी कमांडर इन चीफ आहेत, असं म्हटलं. “तुम्ही कमांडर इन चीफ यांच्याबद्दल करत असलेल्या अपमानजनक टिप्पणीकडे मी अजिबात लक्ष देणार नाही. ते आमचे सर्वोत्तम सरसेनापती आहेत ” असं अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी जेकब्स यांना उत्तर देत सांगितलं.

खरं तर, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असतानाच आणि विरोधी पक्ष ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांवर सातत्याने टीका करत असतानाच हा वाद झाला. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, रिपब्लिकन पक्षाच्या माजी काँग्रेस सदस्या मार्जोरी टेलर ग्रीन यांनीही इराण युद्धासंदर्भात ट्रम्प यांच्या मानसिक स्थितीवर सवाल उपस्थित केला होता. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर युद्धाला तोंड फुटलं होतं.

या युद्धादरम्यान ट्रम्प यांनी केलेल्या अनेक दिशाभूल करणाऱ्या ट्विट्सचा जेकब्स यांनी दाखला दिला. “आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल,” ट्रम्प यांच्या या विधानाचाही डेमोक्रॅटिक खासदार सारा यांनी उल्लेख केला. एवढंच नव्हे तर तर जेकब्स यांनी ट्रम्प यांना येशू ख्रिस्ताच्या रूपात लोकांना बरे करताना दाखवणारा एक फोटोही दाखवला. “मी माझ्या मतदारांना हे कसे समजावून सांगू?” असा सवाल जेकब्स यांनी यावेळी विचारला. यावेळी जेकब्स आणि हेगसेथ यांच्यात जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

Follow Us