
US deal with Pakistan for oil reserves : अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प एकापाठोपाठ एक घोषणा करुन जगाला झटका देत आहेत. नुकतीच त्यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. गुरुवारी त्यांनी आणखी एक धक्का देणारी घोषणा करत डबल अटॅक केला. ट्रम्प यांनी भारताचा शत्रू पाकिस्तानसोबत हातमिळवणी केली आहे. अमेरिकेने पाकिस्तानचं विशाल तेल भंडार विकसित करण्याचा करार निश्चित केला आहे.
कदाचित एकदिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल असं सुद्धा ट्रम्प बोलून गेले. ट्रम्प यांनी हा खुलासा आपलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथसोशलवर केला आहे. त्यांनी लिहिलय की, “आम्ही पाकिस्तानसोबत एक मोठा करार केला आहे. त्यांचं विशाल तेल भंडार विकसित करण्यासाठी त्यांच्यासोबत मिळून काम करणार आहोत. आम्ही लवकरच या कराराच नेतृत्व करणाऱ्या तेल कंपनीची निवड करणार आहोत. कोणाला माहित, कदाचित एकदिवस ते भारताला तेल विकतील” असं ट्रम्प म्हणाले.
‘हे मी सहन करणार नाही’
ट्रम्प यांचं हे स्टेटमेंट अशावेळी आलं आहे, जेव्हा त्यांनी नुकताच भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला आहे. रशियासोबत भारताचा वाढता तेल व्यापार आणि शस्त्रास्त्र व्यापारावरुन ट्रम्प यांनी भारताला कठोर इशारा दिला आहे. भारत ब्रिक्सचा सदस्य आहे, त्यावरुनही ट्रम्प यांनी भारतावर निशाणा साधला. “ही संघटना अमेरिकी डॉलर विरोधात असल्याचा त्यांनी आरोप केला. भारतासोबत व्यापारिक चर्चा सुरु असल्याच त्यांनी सांगितलं. ब्रिक्स ज्यामध्ये भारत सहभागी आहे, ती परिषद डॉलर विरोधात आहे. हे मी सहन करणार नाही. भारतासोबत आमचं व्यापारी नुकसान मोठं आहे” असं ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांची इतकी नाराजी का?
फेब्रुवारी 2022 पासून भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी सुरु केली. रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियाकडून तेल खरेदी बंद केली होती. त्याचवेळी भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी सुरु केली. आधी रशियाकडून तेल खरेदी 1 टक्क्यापेक्षा पण कमी होती. पण त्याच रशियाकडून आता एक तृतीयांश तेल पुरवठा होतो. ट्रम्प यांचा हा नवीन डाव भारतासाठी एक राजकीय आणि आर्थिक संदेश आहे. याचा परिणाम येणाऱ्या दिवसात पहायला मिळू शकतो.