
इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, यामुळे मध्य पूर्वेमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. याचदरम्यान आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केल्यानं तिथे शातंता प्रस्थापित झाली, त्याचप्रमाणे आता आपण इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेलं युद्ध देखील थाबवून दाखवू असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर मिसाईल हल्ला केला आहे, इराणची राजधानी तेहरानमध्ये पाच ठिकाणी भीषण कार स्फोट घडवून आणले आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, इस्रायल आणि इराणमध्ये आम्ही पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करू, दोन्ही देशांना सामजस्यानं निर्णय घ्यावा लागणार आहे. मी भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केली. आता त्याचप्रमाणे इराण आणि इस्रायलमध्ये देखील मध्यस्थी करून युद्धविराम घडवून आणू, लवकरच या दोन्ही देशांमधील युद्ध थांबेल. मी अनेकदा मोठी कामं करतो मात्र त्याचं क्रेडिट कधीही घेत नाही, असंही ट्रम्प यांनी आपल्या दाव्यात म्हटलं आहे.
अमेरिकेची डोकेदुखी वाढली
दरम्यान एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून असा दावा करण्यात येत आहे, मात्र दुसरीकडे चीनने अमेरिकेची डोकेदुखी वाढवली आहे. चीनने इस्रायल आणि इराण युद्धात इराणला उघडपणे पाठिंबा दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणच्या पराराष्ट्र मंत्र्यांना फोन करून युद्धाबाबत माहिती घेतली, तसेच इस्रायलकडून इराणावर सुरू असलेल्या हल्ल्यांचा निषेध देखील केला आहे. आम्ही न्यायाच्या भूमिकेनं इराणच्या पाठीशी उभे आहोत, आम्ही इराणचं समर्थन करतो असं चीनने म्हटलं आहे. त्यामुळे आता अमेरिकेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
चीनकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. इराणला त्यांचं संरक्षण करण्याचा हक्क आहे. आम्ही इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांचा निषेध करतो, असं चीनच्या पराराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.