
बहुप्रतिक्षीत नोबेल शांतता पुरस्कार 2025 ची आज घोषणा होणार आहे. थोड्याच वेळात पुरस्काराची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे जाहीर होईल. गेल्या सहा महिन्यांपासून हा पुरस्कार मिळावा यासाठी ट्रम्प यांनी कंबर कसली होती. त्यासाठी त्यांनी जगात उलथापालथ केली. आपण 7 युद्ध थांबवल्याचा दावा केला. तर इस्त्रायल, पाकिस्तानसह अनेक राष्ट्रांनी त्यांच्या नावाची नोबेल निवड समितीकडे शिफारस केली होती. गेल्या दोन दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांनी तर जंगजंग पछाडले. आता डावपेच यशस्वी होतात की त्यांची जगभरात नाचक्की होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
338 जणांची शिफारस
नोबेल शांतता पुरस्कारसाठी 338 जणांच्या नावाची शिफारस करण्यात आली. नामांकन यादीत चीन, रशिया, पॅलेस्टाईनमधील मानवाधिकार कार्यकर्ते, इंडोनेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान,उद्योगपती एलॉन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पण नावे आहेत.
ट्रम्प यांच्या दादागिरीने यंदा हा पुरस्कार खूप गाजला. ट्रम्प यांनी हा पुरस्कार गळ्यात पडून घेण्यासाठी थेट युरोपातील देशांवर मोठा दबाव टाकला. त्यांनी नॉर्वच्या अर्थमंत्र्यांना या काळात अनेकदा फोन केला. निवड समितीने आपले नाव निवडावे यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. टॅरिफ लावण्याची खेळी खेळली. तर हा पुरस्कार मिळाला नाही तर हा अमेरिकेचा मोठा अपमान ठरेल असा दबावही त्यांनी टाकून पाहिला. गेल्या दोन दिवसात तर त्यांनी जंगजंग पछाडले. त्यामुळे त्यांचे हे दबावतंत्र यशस्वी होते की नाही हे अगदी थोड्याच वेळात समोर येईल.
ओस्लोत होणार घोषणा
नोबेल शांतता पुरस्कार निवड समिती लवकरच ओस्लोत या पुरस्काराची घोषणा करेल. नॉर्वेच्या संसदेने नियुक्त केलेले पाच सदस्य असतात. ते या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड करतात. त्यापूर्वी जागतिक घटना, ट्रेंड आणि शांतता प्रयत्नांचा अभ्यास करतात. या पुरस्कारासाटी सरकार, राष्ट्रप्रमुख, प्राध्यापक आणि माजी विजेत्यांसह अनेक स्त्रोतांकडून नामांकने येतात. नामांकनांची संपूर्ण यादी 50 वर्षांपासून गुप्त आहे. यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव असले तरी त्यांची निवड होते की नाही हे लवकरच समोर येईल. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे या पुरस्काराची घोषणा होईल. नोबेल पुरस्कार संस्थेच्या अधिकृत डिजिटल चॅनेलवर , सोशल मीडियावर या पुरस्काराची माहिती घेता येईल. शांतता पुरस्कार हा या आठवड्यात जाहीर झालेल्या सहा प्रतिष्ठित नोबेल पुरस्कारांपैकी एक आहे. ट्रम्प यांच्यामुळे यंदा हा पुरस्कार सर्वाधिक चर्चेत आहे.