
Israel Hamas War: इराण-इस्त्रायलमधील युद्ध थांबल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक युद्ध थांबवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी मध्यस्थाची भूमिका सुरु केली आहे. पुढील आठवड्यात इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदीची घोषणा होऊ शकते. गेल्या २० महिन्यांपासून हे युद्ध सुरु आहे.
ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, गाझा-इस्त्रायलमधील युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेसाठी करार करण्याच्या प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी संबंधित काही व्यक्तींशी बोलणे झाले आहे. गाझा पट्टीत एका आठवड्यात युद्धबंदी होईल. परंतु त्यांनी तपशीलवार माहिती दिली नाही.
टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इराणसोबतच्या युद्धानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्रायलवर गाझामध्ये हमाससोबत सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी दबाव आणत आहेत. ट्रम्प आता अब्राहम करार वाढवू इच्छितात. बिन्यामिन नेतन्याहूंविरुद्धचा खटला रद्द करण्याची ट्रम्पची मागणी देखील याबाबत आहे. ट्रम्प यांनी अलिकडेच ट्रुथ सोशलवर नेतन्याहूंविरुद्धच्या फौजदारी खटल्याचा निषेध केला होता आणि तो खटला संपवण्याची मागणी केली होती. या मागणीमागे गाझामधील युद्ध संपवणे, सर्व ओलिसांची सुटका करणे हा उद्देश आहे.
गेल्या महिन्याभरापासून गाझामध्ये जेवणाचे वाटप करणाऱ्या गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन (GHF) या संस्थेला अमेरिकेने 30 दशलक्ष डॉलरची देणगी दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, गाझामध्ये भयानक परिस्थिती सुरू आहे. आम्ही त्या भागात भरपूर पैसे आणि भरपूर अन्न पाठवत आहोत.
गाझामधील संघर्षाची सुरुवात ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली. त्या वेळी हमासने इस्रायलवर हल्ला केला. त्यात १,२०० लोक मारले गेले आणि २५१ जणांना हमासने ओलीस ठेवले. त्यानंतर इस्रायलने गाझामध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू केली. या संघर्षात आतापर्यंत ५६ हजार ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचे गाझामधील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. त्यात सर्वाधिक महिला आणि मुले आहेत.