
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे, गेल्या तीन वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे, मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. अमेरिकेकडून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून त्यासाठी रशियावर दबाव निर्माण करण्यात येत आहे. आता याच दरम्यान मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा अमेरिका आणि युरोपीयन देशांबाबत मोठा दावा केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार रशिया आणि युक्रेनमधील युद्धविरामाची चर्चा पुन्हा एकदा मागे पडली आहे, शांततेची चर्चा सध्या बंद असल्याचं रशियाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच यावेळी रशियानं युरोपीयन देशांवर गंभीर आरोप केले आहेत. युरोपीयन देश युद्धविरामाच्या चर्चेमध्ये अडथळे निर्माण करत असल्याचं रशियानं म्हटलं आहे. आम्ही युक्रेनसोबत शांततेची चर्चा बंद केल्याची घोषणाही यावेळी रशियाकडून करण्यात आली आहे.
रशियन सरकारच्या प्रवक्त्यानं याबाबत माहिती देताना म्हटलं की, सध्या शांततेची चर्चा पूर्णपणे ठप्प आहे. मात्र सध्याची परिस्थिती पहाता आम्हाला अशी अशा वाटते की, पुन्हा एकदा शांततेची चर्चा सुरू होऊ शकते. पंरतु या चर्चेमध्ये युरोपीयन देशांकडून सातत्यानं अडथळे निर्माण केले जात आहेत, असा दावा देखील रशियन प्रवक्त्यानं केला आहे.
याचदरम्यान रशियाकडून आणखी एक मोठा दावा करण्यात आला आहे, तो म्हणजे एकाच रात्रीत युक्रेनचे तब्बल 221 ड्रोन पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. युक्रेनचे 221 ड्रोन पाडण्यात आले आहेत. रशियाच्या संरक्षण विभागानं दिलेल्या माहितीनुसार रशियानं युक्रेनचे 221 ड्रोन पाडले आहेत स्मोलेन्स्कमध्ये 42, ब्रायंस्कमध्ये 85, सेंट पीटर्सबर्गमध्ये 28 ड्रोन पाडण्यात आल्याचा दावा रशियानं केला आहे.
दरम्यान रशियाला देखील शांतता पाहिजे, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, मात्र युरोपीन देश या मार्गात मोठा अडथळा ठरत आहेत. युरोपीयन आणि नाटो देशांची एक वेगळीच रणनीती आहे. एकीकडे ते युद्धविरामासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दिखावा करतात तर दुसरीकडे ते सातत्यानं युक्रेनला अधुनिक शस्त्रास्त्र आणि सैन्याचा पुरवठा करत असल्याचा आरोप देखील रशियाकडून करण्यात आला आहे.