
इस्रायल गेल्या काही काळापासून गाझा पट्टीसह येमेन आणि इतर देशांमधील हुथी बंडखोरांवर हल्ले करत आहे. मात्र आता हुथी बंडखोरांनी इस्रायलवर हल्ला करण्याची तयारी केली आहे. येमेनमधील हुथी बंडखोरांनी पर्वत आणि वाळवंटात लपून शस्त्रास्त्रांचे कारखाने तयार केले. या कारखान्यांमध्ये लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि स्फोटक ड्रोन तयार करण्यात आले आहेत. याद्वारे आता इस्रायलवर हल्ला करण्याची योजना आहे. यामुळे इस्त्रायलची चिंता वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इस्रायलने काही दिवसांपूर्वी ऑपरेशन मूव्हिंग पॅकेजचा एक भाग म्हणून येमेनमधील सनावर मोठा हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात 65 पेक्षा जास्त बॉम्ब टाकण्यात आले होते. यात हुथी कमांड सेंटर आणि शस्त्रास्त्रे उद्ध्वस्त करण्यात आली होती. हुथी ड्रोनने इस्रायली शहर इलातवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणूनही हा हल्ला करण्यात आला होता. मात्र आता हुथी लोक इस्रायलवर हल्ला करण्याची तयारी करत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार हुथी बंडखोर आता शस्त्रे आयात करण्याऐवजी शस्त्रे तयार करण्यावर भर देत आहेत. यात जड, अधिक अचूक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांचा समावेश आहे. इस्रायली गुप्तचर संस्थांना असाही संशय आहे की, हमासने 7 सप्टेंबर रोजी रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याप्रमाणेच मोठा हल्ला करण्याची योजना हुथी बंडखोरांनी केली आहे. आता हा हल्ला यशस्वी होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हुथी बंडखोरांनी इस्रायलवर हल्ला करण्याच्या आपल्या योजनेला “तुफान अल-अक्सा” किंवा “जेरुसलेम फ्लड” असं नाव दिलं आहे. यासाठी हुथी सैनिकांची भरती सुरु आहे, या सैनिकांनी घुसखोरीसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. आता इस्रायलवर हल्ला येमेनमधून नव्हे तर जॉर्डन किंवा सीरियामधून केला जाण्याचीही शक्यता आहे अशी माहितीही समोर आली आहे.
इस्रायलने या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु केली आहे. इस्रायलने येमेनबद्दल गुप्त माहिती गोळा करण्यासाठी एक नवीन टास्क फोर्स तयार केली आहे. हल्ल्यापूर्वीच हुथींच्या कारखान्यांचा शोध घेणे आणि ते नष्ट करणे हे त्यांचे लक्ष आहे. जर हुथींवर वेळेवर कारवाई केली गेली नाही तर ते अचूक लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रे विकसित करू शकतात, ज्यामुळे इस्रायलसह इतरही देशांची चिंता वाढू शकते.