मोठी बातमी! इस्रायलचा सीरियावर भीषण हल्ला, थेट लष्कराच मुख्यालय उडवलं

इस्रायलने सीरियन लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला. ड्रुझ समुदायाचे रक्षण करण्यासाठी इस्रायलने दमास्कसमधील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! इस्रायलचा सीरियावर भीषण हल्ला, थेट लष्कराच मुख्यालय उडवलं
israel attack on syria
| Updated on: Jul 16, 2025 | 5:03 PM

आणखी एका युद्धाला सुरुवात झाली आहे. आज (बुधवार) इस्रायलने सीरियन लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला. यात मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून सीरियन लष्कर आणि ड्रुझ समुदायाच्या गटांमध्ये संघर्ष सुरु आहे. यात ड्रुझ समुदायाचे रक्षण करण्यासाठी इस्रायलने दमास्कसमधील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे. त्यामुळे आता सीरिया कसे प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सीरियावरील हल्ल्याची माहिती देताना इस्रायल डिफेन्स फोर्सने X वर म्हटले की, आम्ही सीरियाच्या दमास्कस प्रदेशातील सीरियाच्या लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला केला आहे. सध्या आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. इस्रायली सरकारच्या निर्देशानंतर हा हल्ला केल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. आता सीरिया ड्रुझ समुदायाबाबत काय निर्णय घेणार यावर इस्लायलचे बारीक लक्ष आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सीरियाच्या दक्षिण स्वैदा भागात गेल्या काही दिवसांपासून हिंसक चकमकी सुरु आहेत. सीरियन सुरक्षा दल आणि ड्रुझ मिलिशिया गटात युद्धबंदीचा निर्णय झाला होता, मात्र नंतर युद्धबंदीचे उल्लंघन झाले, त्यानंतर सीरियन लष्कराने स्वैदा प्रांतात कारवाई केली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी संघर्ष पुन्हा सुरु झाला.

आज (बुधवार), सीरियन लष्कर आणि ड्रुझ सदस्यांमध्ये संघर्ष झाला. सुरक्षा दलांनी तागी नागरिकांची घरे जाळल्याचे वृत्त समोर आले आहे. या संघर्षांमध्ये 2 लहान मुलांसह 30 लोकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच आतापर्यंत या संघर्षात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 138 ड्रुझ सैनिकांचाही समावेश आहे. त्यामुळे आता इस्रायलने सीरियावर हल्ला केला आहे.

इस्रायलचा याआधीही हल्ला

इस्रायलने काल दक्षिण सीरियातील स्वैदा प्रदेशातील सिरियन सैन्य तळांवर हल्ला केला होता. या भागात राहणाऱ्या ड्रुझ समुदायाच्या सुरक्षिततेसाठी इस्रायलने ही कारवाई केली होती. याचे आणखी एक कारण म्हणजे देशाच्या सुरक्षेसाठी इस्रायलला आपल्या सीमेला लागून असलेल्या या भागात शस्त्रे नको आहेत, त्यामुळेच हा हल्ला करण्यात आला आहे.

ड्रुझ समाजाचे रक्षण करणार

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी ड्रुझ समाजाचे रक्षण करणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, ‘सीरियन सरकार स्वैदामध्ये शस्त्रांसह पोहोचले होते ते नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीरियाच्या ड्रुझ समुदायाशी आमचे खोल नाते आहे. त्यामुळे आम्ही त्या समाजाचे रक्षण करणार आहोत.’