
गेल्या काही दिवसांपासून जगात तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याची तयारी केली आहे. अमेरिकेसोबत इस्रायलही इराणवर हल्ला करू शकतो. हे दोन्ही देश संयुक्त कारवाईही करण्याची शक्यता आहे. अशातच आता आणखी एक देश इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटनने आता तयारीला सुरुवात केली आहे. हा देश इराणवर थेट हल्ला करण्याच्या मनःस्थितीत नाही, मात्र ब्रिटनने आखाती प्रदेशात एक मोठे लष्करी पाऊल उचलले आहे. त्यामुळे इराणची अडचण आणखी वाढली आहे.
आगामी काळात इराणवर हल्ला झाला आणि इराणने प्रत्युत्तर दिले तर त्यापासून आखाती देशांना वाचवण्यासाठी ब्रिटिश रॉयल एअर फोर्स (RAF) टायफून लढाऊ विमाने कतारला पाठवण्यात आली आहेत. कतारने सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर ही विमाने कतारला पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे इराणची चिंता आणखी वाढली आहे कारण या विमानांच्या तैणातीमुळे ब्रिटनही थेट युद्धात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या काही काळापासून मध्यपूर्वेत तणाव आहे. अमेरिकेने आधीच आपले नौदल आणि हवाई दल इराणच्या आजूबाजूला तैणात केले आहे. त्यानंतर इराणनेही सावध भूमिका घेतली आहे. इराणने इशारा दिला आहे की कोणताही हल्ला हा युद्धाची सुरूवात मानली जाईल. कतारसारख्या लहान देशांवर या युद्धाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण युद्धाची आव्हाने केवळ लष्करी आघाडीपुरती मर्यादित नाहीत. याचा आर्थिक, सामाजिक आणि सुरक्षा चिंतांवर परिणाम होऊ शकतो.
कतारमध्ये लढाऊ विमानांची तैनाती केल्यानंतर ब्रिटिशच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, ही तैनाती इराणवर हल्ला करण्यासाठी नव्हे तर बचावात्मक आणि भागीदारीच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे. कतार आणि ब्रिटनमधील संरक्षण सहकार्य अनेक दशकांपासून सुरू आहे, त्यामुळेच ब्रिटनने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाबाबत बोलताना ब्रिटनने स्पष्टपणे सांगितले आहे की, आम्ही अमेरिकन लष्करी हल्ल्यात सहभागी होणार नाही. कारण ब्रिटिश आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार पहिल्या हल्ल्यात ब्रिटन सहभागी होऊ शकत नाही. मात्र जर इराणने प्रत्युत्तर दिले तर ब्रिटन शेजारील देशांच्या संरक्षणासाठी पावले उचलू शकतो. मात्र ब्रिटन थेट इराणवर हल्ला करणार नाही.