PM Narendra Modi : अखेर ट्रम्प यांचं एक चांगलं काम, पंतप्रधान मोदींनी सुद्धा कौतुकात नाही ठेवली कसर

PM Narendra Modi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या सतत भारताविरुद्ध भूमिका घेत आहेत. भारताला नडण्याच्या भूमिकेत ते आहेत. त्यांनी अनेक भारताविरुद्ध निर्णय घेतले आहेत. मात्र, असं असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं एका चांगल्या कामासाठी कौतुक केलं आहे.

PM Narendra Modi : अखेर ट्रम्प यांचं एक चांगलं काम, पंतप्रधान मोदींनी सुद्धा कौतुकात नाही ठेवली कसर
Donald Trump - Narendra Modi
| Updated on: Oct 09, 2025 | 12:38 PM

मागच्या अनेक वर्षांपासून गाझा पट्टीत सुरु असलेला संघर्ष आता थांबण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. अनेक दशकांपासून सुरु असलेल्या या सशस्त्र संघर्षात आतापर्यंत अनेक निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने आता एक योजना तयार झाली आहे. त्यात पॅलेस्टाइनला देश म्हणून मान्यता मिळू शकते आणि हा संघर्ष थांबेल. इस्रायल आणि हमास या दोघांनीही आता अमेरिकेचा गाझा शांतता प्रस्ताव मान्य केला आहे. या प्रस्तावातील पहिल्या टप्प्याला सहमती दर्शवली आहे. हमासने हा प्रस्ताव मान्य करण्यासाठी थोडा जास्त वेळ घेतला. अखेर अमेरिकेच्या दबावासमोर त्यांचं काही चाललं नाही. प्रस्ताव मान्य केला नाही, तर परिणाम भोगण्यास तयार राहा अशी धमकीच अमेरिकेने हमासला दिली होती. त्यामुळे त्यांना प्रस्ताव मान्य करावा लागला आहे.

इस्रायल आणि हमास यांनी हा प्रस्ताव मान्य केल्यानंतर त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया आली आहे. “राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या पहिल्या टप्प्याच आम्ही स्वागत करतो. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मजबूत नेतृत्वाच यात प्रतिबिंब दिसून येतं” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “बंधकांची सुटका होईल आणि गाझाच्या लोकांपर्यंत मानवी मदत वाढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. शांततेचा एक कायमस्वरुपी मार्ग निघेल” अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली.

7 ऑक्टोंबर 2023 चा तो दिवस त्यानंतर सगळं बदललं

7 ऑक्टोंबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये हल्ला केला. इस्रायलच्या जवळपास 1200 नागरिकांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. गर्भवती स्त्रिया, लहान मुलं यांच्याबाबतीत अत्यंत अमानवीयता दाखवली. त्यानंतर सुरु झालं एक भयंकर युद्ध. इस्रायलने गाझा पट्टीत अक्षरक्ष: धुमाकूळ घातला. अजूनही तेच सुरु आहे. इस्रायलवर मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय दबाव आला. मात्र इस्रायल अजूनही बधलेलं नाही. इस्रायलकडून गाझा पट्टीत हल्ले सुरुच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी 20 कलमी कार्यक्रम तयार करण्यात आलाय. त्या प्रस्तावातील हा पहिला टप्पा आहे, जो दोन्ही देशांनी मान्य केला आहे.