US–IRAN Tensions : नवा हल्ला झाला तर चोख उत्तर देऊ, इराणने अमेरिकेशी चर्चेवर मारली फूली, कोंडी कधी फुटणार ?
इराणने स्पष्ट केले आहे की, सध्या अमेरिकेसोबत नवीन चर्चा करण्याची त्यांची कोणतीही योजना नाही. त्यांनी अमेरिकेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे, समुद्री नाकेबंदी लादणे आणि जहाजांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. अमेरिका केवळ आरोप करीत आहे आणि राजनैतिक संबंधांबाबत गंभीर नाही, त्यामुळे विश्वास संपला आहे.

इराणवर अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी हल्ला केल्यानंतर हे युद्ध थांबण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला होता. इस्लामाबाद येथे पहिली चर्चेची फेरी अयशस्वी झाली आहे. आता दुसऱ्या फेरीसाठी बोलणी सुरु आहेत. मात्र, या दरम्यान अमेरिकेने नाकेबंदी केल्याने खुली केली होर्मुझ सामुद्रधुनी इराणने पुन्हा बंद केली आहे. आता इराणने स्पष्ट केले आहे की आता अमेरिकेसोबत नवीन चर्चा करण्याचा कोणताही प्लान नाही. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सोमवारी प्रेस कॉन्फरसमध्ये सांगितले की सध्या चर्चे संदर्भात कोणतीही तयारी चालू नाही. हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा दोन्ही देशांच्या दरम्यान चर्चे संदर्भात अनिश्चितता बनलेली आहे.
इराणने अमेरिकेवर आरोप लावला आहे की तो चर्चे संदर्भात गंभीर नाहीए. आणि वारंवार सीजफायरचे उल्लंघन करत आहे. बघाई यांनी म्हटले आहे की अमेरिकेचे बोलणे आणि त्यांचे वागणे परस्पर विरोधी आहे. त्यामुळे विश्वासार्हता नष्ट झाली आहे. ते म्हणाले की अमेरिका सातत्याने इराणला दोषी ठरवण्याचा ब्लेम गेम खेळत आहे.
अमेरिकेवर नियम तोडल्याचा आरोप
इराणच्या मते अमेरिकेने लेबनॉनशी संबंधित कराराचे ही योग्य प्रकारे पालन केले नाही आणि आपल्या जबाबदारी पासून मागे हटला. याशिवाय अमेरिकेने इराणवर समुद्री नाकेबंदी लावण्याचा प्रयत्न केला असून तो सीजफायरचे उल्लंघन आहे. इराणने हा देखील आरोप केला आहे की अमेरिकन सैन्याने एका इराणी व्यापारी जहाजावर हल्ला केला, जो आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरुध्द आहे.
बघाई यांनी म्हटले की अमेरिकेने आधीही चर्चे दरम्यान हल्ले केले आहेत. आणि इराण त्यास विसरलेला नाही. त्यांनी सांगितले की या सर्व मुद्यांची माहिती पाकिस्तान द्वारे मध्यस्थ म्हणून दिली होती, परंतू तरीही अमेरिकेचे वागणे बदललेले नाही.
अमेरिकेवर विश्वास नाही – इराण
इराणने हे देखील स्पष्ट केले की त्यांनी इस्लामाबादमध्ये १० मुद्यांचा प्रस्ताव दिला होता, ज्यावर चर्चा झाली,परंतू अमेरिकेच्या कारवाईने विश्वास आणखीन कमजोर झाला आहे. इराणने दावा केला आहे की होर्मुझ आधी सुरक्षित होता, परंतू अमेरिका आणि इस्रायलच्या कारवाईनंतर परिस्थिती बिघडली आहे.
प्रवक्त्याने स्पष्ट सांगितले की जर अमेरिकेने किंवा इस्रायलने पुन्हा कोणताही हल्ला केला तर इराणचे सैन्य त्याला उत्तर देईल. तसेच त्यांनी याचाही पुनरुच्चार केला की इराण आपल्या राष्ट्रीय हिताचे संरक्षण करेल. इराणने स्पष्ट केले आहे की जोपर्यंत विश्वासार्हता परत येत नाही तोपर्यंत अमेरिकेसोबत नवीन चर्चेची शक्यता खूप कमी आहे.