
दहशतवादाविरोधात भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं जात असतानाच पाकिस्तानमधील एका जागेचं नाव सध्या जागतिक माध्यमांमध्ये ट्रेंड होऊ लागलं आहे. सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा आहे. हे नाव आहे ‘किराना हिल्स’. गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला हे नाव सतत ऐकायला मिळालं असेल. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात खोलवर वसलेलं आणि फारसं स्पष्ट नसलेलं हे ठिकाण ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. पाकिस्तानकडून झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने जोरदार हवाई हल्ले केले. जवळपास तीन तास सुरू असलेल्या या हल्ल्यात भारतीय हवाई दलाने (IAF) 11 पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त केले. पाकिस्तान हवाई दलाला (PAF) आधार देणाऱ्या सुमारे 20 टक्के पायाभूत सुविधा नष्ट केल्याची माहिती समोर आली. या हल्ल्यांचे फोटो आणि लष्करी कारवाईबद्दलची माहिती बातम्यांमध्ये पसरत असताना सोशल मीडियावर ‘किराना हिल्स’ या जागेविषयी कुजबुज अधिकच वाढली. पाकिस्तानमधील अण्वस्त्र साठा असलेल्या ‘किराना हिल्स’ला भारताने लक्ष्य केलं का, असा सवाल सतत विचारला जात आहे. ...