
Nikki Haley on India : भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार निक्की हेली यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चीनला धक्का बसणार आहे. त्यांचं हे विधान भारतासाठी मात्र फायदेशीर मानले जात आहे. रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय-अमेरिकन निक्की हेली म्हणाल्या की, मी सत्तेवर आल्यास केवळ नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनला (नाटो)च नव्हे तर भारतालाही सहकार्य करेल. त्या ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया आणि फिलीपिन्ससह इतर अनेक देशांशी आपले संबंध मजबूत करेल.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून आल्यास नाटोसोबतच्या संबंधांना धोका निर्माण होऊ शकतो, असे हेली म्हणाल्या. जर ट्रम्प पुन्हा एकदा सत्तेत आले तर अनेक मुद्द्यांची चिंता आहे. त्यांच्यामुळे नाटोशी संबंधांना धोका आहे. नाटो ही 75 वर्षांची यशोगाथा आहे. अमेरिकेतील 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांच्या विरोधात हॅली या एकमेव उमेदवार उरल्या आहेत.
NATO ही 31 सदस्य असलेल्या राष्ट्रांची लष्करी युती आहे, ज्यामध्ये युरोपमधील २९ तर दोन उत्तर अमेरिकेतील देशांचा समावेश आहे. हेली म्हणाल्या की, चीन नेहमीच या आघाडीचा विरोधक राहिलायय. अशा परिस्थितीत नाटोला बळकट करणे आवश्यक आहे. सुमारे एक आठवड्यापूर्वी, ट्रम्प यांनी कॅरोलिनामध्ये टिप्पणी केली होती की ते रशियाला कोणत्याही नाटो सदस्य राष्ट्रासोबत “काहीही” करण्यास प्रोत्साहित करतील.
यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर हेली म्हणाल्या की, नाटोमध्ये आणखी मित्र देश जोडणे आवश्यक आहे. ही वेळ एकत्र उभे राहण्याची आहे. 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या पाठीशी उभे राहिलेल्या मित्र देशांची बाजू घेण्याची ही वेळ आहे.
एका प्रश्नाला उत्तर देताना हेली म्हणाल्या की, “मी वचन देते की, जर मला राष्ट्राध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली तर आम्ही नाटोला बळकट करूच, शिवाय भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, फिलीपिन्स या देशांसोबतचे संबंधही मजबूत करू.” त्यांनी या वक्तव्यातून ‘क्वाड’ संघटनेची ताकद सांगितली. आम्ही त्यात आणखी देशांना जोडू. भारत आणि अमेरिकेशिवाय ऑस्ट्रेलिया आणि जपानचाही यामध्ये समावेश आहे.