
जेफ्री एपस्टीन या एका नावाने अमेरिकेसह जगाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. काल शुक्रवारी जेफ्री एपस्टीनच्या फाईल्स ओपन झाल्या. या प्रकरणाची जास्त चर्चा यासाठी आहे कारण, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक नेते, सेलिब्रिटी यांचे एपस्टीनसोबत चांगले संबंध होते. एपस्टीन जिथे पार्टी करायचा, तिथे अल्पवयीन मुली असायच्या. त्या ठिकाणी ही मोठी नावं सुद्धा हजर असायची असा आरोप आहे. एपस्टीन यांची डायरी, त्याच्या प्रवासाची माहिती, ईमेल, चिठ्ठ्या, कागदपत्र ही सर्व आता जनतेसमोर येणार आहेत. त्यातून अनेक मोठे, धक्कादायक खुलासे होऊ शकतात.
या जेफ्री एपस्टीनमुळे एवढी खळबळ उडाली आहे, तो कोण होता? अमेरिकेतील एका छोट्या शहरात शाळेत शिकवणारी व्यक्ती, जो स्वत: कधी ग्रॅज्युएट होऊ शकला नाही, कशा यशाच्या, आर्थिक सुबत्तेच्या शिड्या चढत गेला? हा व्यक्ती कसा राजकीय आणि ग्लॅमर विश्वातील मोठ्या नावांपर्यंत पोहोचला?. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत एपस्टीनच नाव का जोडलं जातं?. एपस्टीनचा हा सर्व प्रवास कसा होता? जाणून घ्या.
मग, त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही
जेफ्री एपस्टीनचा जन्म आणि सुरुवातीचं आयुष्य न्यू यॉर्कमध्ये गेलं. 1970 च्या दशकात एपस्टीनने न्यू यॉर्कच्या डॉल्टन शाळेत गणित ते भौतिकशास्त्रा सारखे विषय शिकवले. त्याने स्वत: विद्यापीठात या विषयांच शिक्षण घेतलं होतं. पण तो कधी ग्रॅज्युएशन पूर्ण करु शकला नाही. एपस्टीन जेव्हा शाळेत शिकवायचा, तेव्हा एका विद्यार्थ्याचे वडिल त्याच्यावर इतके प्रभावित झाले की, त्यांनी जेफ्रीची वॉल स्ट्रीटवरील एका सीनियर पार्टनर बरोबर भेट घडवून दिली. गुंतवणूकदारासोबत झालेल्या त्या भेटीनंतर जेफ्रीने कधी मागे वळून पाहिलं नाही. चार वर्षानंतर तो गुंतवणूक बँकेचा पार्टनर बनला. 1982 साली तो या फर्मपासून वेगळा झाला आणि जे. एपस्टीन एंड कंपनीची स्थापना केली.
मोठ्या पार्ट्या करु लागला
एपस्टीन आपल्या कंपनीच्या माध्यमातून ज्या क्लायंट्सची संपत्ती संभाळत होता, ज्यांचं त्यावेळी मूल्य एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त होतं. एपस्टीनने आपला संपर्क असा वाढवला की, तो वॉल स्ट्रीटवरील एक चर्चित नाव बनला. त्याची कंपनी अनेक मोठ्या व्यक्तीच्या संपत्तीचं व्यवस्थापन करायची. त्यात मिळालेल्या यशातून जेफ्री एपस्टीनने भरपूर कमाई केली. पुढच्या काही वर्षात त्याने फ्लोरिडामध्ये मॅन्शन, न्यू मॅक्सिकोमध्ये रँच आणि न्यूयॉर्कमध्ये सर्वात मोठं खासगी घर विकत घेतलं. इथे तो सेलिब्रिटी, कलाकार आणि नेत्यांसोबत मोठ्या पार्ट्या करु लागला. अशाच एका पार्टीला त्यावेळी उदयोन्मुख अब्जाधीश डोनाल्ड ट्रम्प हजर होते.
फक्त ट्रम्प यांच्यासोबतच नाही, तर…
जेफ्री एपस्टीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या. दोघांचे काही काळानंतर संबंध सुद्धा बिघडले. त्याचा खुलासा स्वत: ट्रम्प यांनी केलाय. फक्त ट्रम्प यांच्यासोबतच नाही, तर आपल्या घरी होणाऱ्या महागड्या आणि आलिशान पार्ट्यांमधून त्याने अनेक मोठ्या नावांशी संपर्क बनवला. यात माजी राष्ट्रपतींपासून अभिनेते, परदेशी नेते आणि चर्चित चेहरे यांचा यामध्ये सहभाग होता.
त्याची वाईट वेळ कधी सुरु झाली?
2005 साली एपस्टीन विरोधात एक मोठं प्रकरण घडलं. एका अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी फ्लोरिडा पोलिसांकडे तक्रार केली. एपस्टीनने त्यांच्या मुलीच पाम बीचवरील त्याच्या घरात शोषण केलय. पोलिसांनी त्यानंतर एपस्टीनच्या घरावर छापा मारला. त्यावेळी पोलिसांना घराच्या वेगवेगळ्या भागातून अनेक मुलींचे फोटो मिळाले. चौकशीत समोर आलं की, पीडितांमध्ये 50 मुली आणि एक मुलगा होता. सर्व मुलींची कथा एकसारखीच होती. इथूनच एपस्टीन कायद्याच्या कचाट्यात अडकत गेला. एका कायदेशीर लढाईची सुरुवात झाली.