Israel Election Result : इस्रायलमधले जे दोन प्रमुख पक्ष परस्पराविरोधात निवडणूक लढले, तेच आता एकत्र येऊन सरकार बनवणार, कमालीचा कट्टरतावाद
Israel Election Result : इस्रायलमध्ये नवीन सरकार बनवण्यात अमेरिकेची भूमिका महत्वाची असणार आहे. इस्रायलमधले जे दोन प्रमुख पक्ष परस्पराविरोधात निवडणूक लढले, तेच आता एकत्र येऊन सरकार बनवणार आहेत.

इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला आहे. पण पंतप्रधान कोण होणार? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. कारण मतदारांनी कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेलं नाही. त्रिशंकू स्थिती तिथे तयार झाली आहे. वर्तमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे गादी आयजनकोट या दोघांकडेही बहुमत नाहीय. आयजनकोट यांच्याकडे अरब पक्षांचं समर्थन मागण्याचा पर्याय आहे. पण ही शक्यता कमीच आहे. आता सर्व नजरा अमेरिकेकडे लागल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये एक बातमी आलेली. त्यानुसार व्हाइट हाऊसकडून बेंजामिन नेतन्याहू आणि आयजनकोट यांच्यात तडजोड घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. इस्रायलमध्ये बिगर मुस्लिम आघाडीचं सरकार असावं ही व्हाइट हाऊसची इच्छा आहे. अरब पक्ष सत्तेत आल्यास समीकरण बिघडण्याची भिती व्हाइट हाऊसला आहे.
1 एक मजबूत राइट विंगचं सरकार बनवाव लागेल असं इस्रायलचे वर्तमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं. जेणेकरुन इराणविरोधी आघाडी मजबूत होईल.
2 माजी IDF प्रमुख आयजनकोट यांनी अरब पक्षांचं सहकार्य घेण्याचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. देशसेवेसाठी एक यहूदी सरकार आम्ही बनवणार.
इस्रायलमध्ये असं सरकार बनण्यामागे दोन शक्यता आहेत. एक म्हणजे नेतन्याहू आणि आयजनकोट यांची विचारधारा एकसारखीच आहे. दुसरं कारण अमेरिकेचा दबाव. इस्रायल स्वत:हून कुठला निर्णय घेऊ शकत नाही. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल अवीव मध्ये हस्तक्षेप केला.
आयजनकोट यांच्यासाठी हे घातक ठरु शकतं
इस्रायमध्ये सरकार बनलं नाही, तर तिथे पुन्हा निवडणुका जाहीर होऊ शकतात. आयजनकोट यांच्यासाठी हे घातक ठरु शकतं. नेतन्याहू यांची स्थिती निवडणुकीनंतर अजून मजबूत होऊ शकते. अरब पार्टीच्या उदयाने इस्रायलमध्ये यहूदींना अडचणीत आणलं आहे. पहिल्यांदा अरब पक्षांची स्थिती मजबूत झाली आहे. नेतन्याहू यांनी अरब पक्षांवर निवडणुका चोरल्याचा आरोप केला आहे. येणाऱ्या दिवसात इस्रायलमध्ये हा मोठा मुद्दा बनू शकतो.
इस्रायल एक छोटासा देश असला तरी जागतिक राजकारणात त्यांची भूमिका महत्वाची असते. इस्रायलचं भू-राजकीय स्थान असं आहे की, सतत हा देश युद्धामध्येच असतो. त्यांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तिथे सरकार स्थापन होणं महत्वाचं आहे.