Nimish Kulkarni : निमिष कुलकर्णीनं सोडली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’? अभिनेता म्हणाला, काही महिन्यांपूर्वी…
Nimish Kulkarni On Maharashtrachi Hasyajatra : निमिष कुलकर्णीनं नुकत्याच एका मुलाखतीत हास्यजत्रेबद्दल भाष्य केलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमानं अनेक नवोदित कलाकारांना ओळख मिळवून दिली. त्यापैकी एक म्हणजे निमिष कुलकर्णी. मराठी अभिनेता निमिष कुलकर्णीला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली आणि अभिनेता घराघरात पोहोचला. आता निमिष झी मराठी वाहिनीवरील ‘सनई चौघडे‘ या मालिकेत मॅकची भूमिका साकारत आहे. निमिष, ‘सनई चौघडे‘ या मालिकेत झळकत असल्यामुळे निमिष हास्यजत्रेच्या अलीकडच्या भागांमध्ये दिसत नाहीये. त्यामुळे त्यानं हास्यजत्रा सोडली की काय? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. यावर आता अभिनेत्यानं भाष्य केलं आहे.
हास्यजत्रेबद्दल काय म्हणाला निमिष कुलकर्णी?
निमिष कुलकर्णी म्हणाला की, ”महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पुन्हा करणार का, हा प्रश्नच नाही. कारण मी तो कार्यक्रम सोडलेलाच नाहीय. जेव्हा एखाद्या प्रहसनात माझी गरज असते आणि माझ्या तारखा जुळतात, तेव्हा मी नक्की तिथे काम करतो. काही महिन्यांपूर्वीही मी एका भागाच्या चित्रीकरणासाठी गेलो होतो. त्यामुळे मी हास्यजत्रामधून बाहेर पडलोय, असं नाही.’
‘सध्या फक्त मी नियमितपणे तिथे दिसत नाही, इतकंच! पण भविष्यात माझ्या तारखा जुळल्या, तर मी नक्की काम करेन. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाशी माझं नातं कायम राहणार आहे.’ असं निमिष शेवटी म्हणाला. ‘मुंबई टाइम्स‘सोबत साधलेल्या संवादात निमिष कुलकर्णी बोलत होता.
तसेच ‘सनई चौघडे‘ मालिकेतील मॅकच्या भूमिकेबद्दल बोलताना निमिष म्हणाला की, ‘मला लक्ष्मीकांत सरांना हे पात्र समर्पित करायचं आहे. मी त्यांच्यासारखं १० ते २० टक्के जरी करू शकलो, तर दोन्ही अर्थानी मला असं वाटेल की, मी माझ्या ‘लक्ष्या’ पर्यंत पोहोचलोय!कोणतंही पात्र केवळ विनोदी करण्यासाठी साकारायचं नसतं. त्या पात्राच्या परिस्थितीतून विनोद घडत असतो. प्रत्येक पात्राला स्वतःची भावनिक बाजू असतेमी साकारत असलेलं पात्र आधी मला खरं वाटलं पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील असतो.’
