Israel vs Hezbollah : इस्रायल शत्रुंच्या बाबतीत इतका कट्टर देश का? इतकं क्रौर्य का दाखवतो? कारण….
Israel vs Hezbollah : इस्रायलवर सध्या चहूबाजूंनी टीका सुरु आहे. इस्रायल या देशावरुन जगात दोन गट पडले आहेत. समर्थक आणि विरोधक. इस्रायल शत्रुबद्दल जो विचार करतो, जी कारवाई करतो ती काही जणांना पटते. मात्र काहींच्या मते हे माणुसकीला धरुन नाही. पण इस्रायल मूळातच त्यांच्या शत्रुच्या बाबतीत इतका कट्टर देश का आहे? इस्रायल काहीवेळा इतकं क्रौर्य का दाखवतो? त्यामागे काय कारण आहेत, ते जाणून घ्या.
सध्या सगळ्या जगात इस्रायलची चर्चा आहे. जगातला हा एक छोटासा देश. आकारमानामध्ये इस्रायल भारतातल्या मिजोरम या राज्याएवढा आहे. इस्रायलच क्षेत्रफळ अवघं 21,937 वर्ग किलोमीटर आहे. भारताच क्षेत्रफळ यापेक्षा 150 पट जास्त आहे. भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या घरात आहे, तर इस्रायलची लोकसंख्या काही लाखांमध्ये आहे. जगाच्या पाठिवरील या छोट्याशा देशाने आज सगळ्या जगाला हैराण करुन सोडलय. मागच्या आठवड्यात इस्रायलने लेबनानमध्ये जे केलं, त्यामुळे सगळेच अवाक झाले. एकाचवेळी हजारो हिज्बुल्लाह दहशतवाद्यांच्या खिशातील पेजरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी वॉकी-टॉकीमध्ये बॉम्बस्फोट झाले. एकाचवेळी हजारो पेजरमध्ये ब्लास्ट हे कसं शक्य आहे? त्यासाठी किती प्लानिंग करावी लागली असेल? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता हळूहळू त्या प्रश्नांची उत्तर मिळतायत. आजा पेजर,-वॉकी टॉकी ब्लास्टपेक्षा पण मागच्यावर्षभरापासून इस्रायल ज्या पद्धतीच युद्ध लढतोय, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
इस्रायलच्या बाबतीत सध्या जगात दोन गट पडले आहेत, एक समर्थक आणि विरोधक. इस्रायल विषयी जेव्हा कधी चर्चा आपल्या कानावर पडते, तेव्हा दोन सूर असतात. ‘इस्रायलचा मार्ग बरोबर आहे, आपल्या देशाने सुद्धा असच केलं पाहिजे’ दुसऱ्याबाजूच मत असतं, ‘इस्रायलला मन, भावना, नाही का? इतकी क्रूरता कुठून येते? अशा हिंसाचाराने प्रश्न सुटणार का?’ इस्रायल विषयी सध्या जगात असे दोन मत प्रवाह आहेत. 7 ऑक्टोंबर 2023 हा जगाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरला. या दिवशी जे घडलं, त्यानंतर पश्चिम आशियातील सगळी समीकरणच बदलून गेली. इस्रायल-पॅलेस्टाइन वाद इतका विकोपाला गेला की, इस्रायलने आपल भयानक रुप जगाला दाखवलं. हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून अक्षरक्ष: नरसंहार केला. क्रौर्य ही एकच गोष्ट डोक्यात ठेवून आलेल्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन निरपराध लोकांचे प्राण घेतले. पण गर्भवती महिलांची नाळ कापली. अनेक बालकांना आईच्या गर्भातच संपवलं. या घटनेनंतर इस्रायलने जे प्रत्युत्तर दिलं ते त्यापेक्षाही भयानक होतं. अजूनही इस्रायलची ही कारवाई सुरु आहे.
शत्रुच्या बाबतीत इतका कट्टर का?
मूळात इस्रायल हा देश आपल्या शत्रुच्या बाबतीत इतका कट्टर का आहे? इस्रायल कशा पद्धतीने विचार करतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तर इस्रायलच्या जन्माममध्ये आणि त्याआधी घडलेल्या घटनांमध्ये दडलेली आहेत. इस्रायलमध्ये ज्यू धर्माचे लोक राहतात. इस्रायलची स्थापना होऊन 76 वर्ष झाली आहेत. 14 मे 1948 रोजी इस्रायल हा देश जगाच्या नकाशावर अस्तित्वात आला. डेविड बेन-गुरियन यांनी इस्रायलच्या स्थापनेची घोषणा केली. मूळात पश्चिम आशियात इस्रायलची स्थापना जिथे झाली, त्या भूमीवरुन आधीपासूनच ज्यू आणि पॅलेस्टाइनमध्ये वाद सुरु होता. इस्रायलला आज अमेरिका आणि युरोपच समर्थन आहे, पण इस्रायलच्या सर्व सीमांवर मुस्लिम राष्ट्र आहेत. इजिप्त, लेबनान, जॉर्डन, सीरिया, पॅलेस्टाइन या मुस्लिम देशांच्यामध्ये इस्रायलला वसवण्यात आलय.
इस्रायल देश बनवण्याची पहिली संकल्पना कोणाची?
पहिल्या विश्व युद्धाआधी पश्चिम आशियात पॅलेस्टाइनच्या भागावर ऑटोमन साम्राज्य होतं. ऑटोमन साम्राज्याच्या पराभवानंतर ब्रिटनने पॅलेस्टाइनवर नियंत्रण मिळवलं. त्यावेळी या भूमीवर ज्यू आणि अरब लोक रहायचे. ज्यू अल्पसंख्याक तर अरब बहुसंख्य होते. त्याशिवाय काही दुसऱ्या जाती सुद्धा होत्या. त्यावेळी जगाच्या अनेक भागात ज्यूंवर अत्याचार सुरु होते. जर्मनीत तर हुकूमशाह एडॉल्फ हिटलरने ज्यूंवर अत्याचाराच्या बाबतीत कळस केला. अत्यंत निदर्यतेने त्याने ज्यूंचा नरसंहार चालवलेला. 1917 साली पहिल्यांदा ब्रिटनचे परराष्ट्र सचिव आर्थर बाल्फोर यांनी ज्यूंचा वेगळा देश बनवण्याविषयी मत व्यक्त केलं होतं. ब्रिटनने त्यासाठी पॅलेस्टाइनची निवड केली. 1920 नंतर युरोप आणि जर्मनीतून पळालेले अनेक ज्यू पॅलेस्टाइनमध्ये आले. युरोप आणि जर्मनीत अत्याचार सुरु असल्याने ज्यूंसमोर दुसरा मार्ग नव्हता. हळूहळू या भागात ज्यूंची संख्या वाढू लागली. दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायलच्या स्थापनेवर वेगाने काम सुरु झालं.
स्वातंत्र्याच्या दुसऱ्याचदिवशी हल्ला
1947 साली संयुक्ता राष्ट्राने पॅलेस्टाइनची दोन गटात विभागणी करण्याचा निर्णय घेतला. एक भाग पॅलेस्टाइनला दुसरा ज्यूंच्या देशासाठी म्हणजे इस्रायल. जेरुसलेमला आंतरराष्ट्रीय शहर घोषित करण्यात आलं. पण आसपासच्या मुस्लिम देशांना इस्रायलच अस्तित्व मान्यच नव्हतं. 15 मे 1948 रोजी इस्रायलच्या स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यादिवशी पाच मुस्लिम देशांनी इस्रायलवर हल्ला केला. लेबनान, सीरिया, इराक, इजिप्त आणि सौदी अरेबिया या देशांनी मिळून इस्रायलवर हल्ला केला. वर्षभर चाललेल्या या युद्धात इस्रायलने विजय मिळवला.
पॅलेस्टाइन शरणार्थींचा प्रश्न कधी सुरु झाला?
इस्रायलने पॅलेस्टाइनचा बहुतांश भाग ताब्यात घेतला. पॅलेस्टाइन अरबांना आपली भूमी सोडून पळावं लागलं. इथूनच पॅलेस्टाइन शरणार्थीच्या प्रश्नाची सुरुवात झाली. आजतागयत हा प्रश्न कायम आहे. आता, तर या संघर्षाने भयानक रुप धारण केलय. हमासला संपवणारच अशी शपथ इस्रायलने घेतली आहे. त्यात अनेक निरपराध नागरिक होरपळले जात आहेत. दररोज इस्रायलने गाझा पट्टीत एखाद्या दहशतवाद्याच्या शोधात बॉम्बवर्षाव केल्याच्या बातम्या येतात. पण हा एक दहशतवादी मारताना या संघर्षाशी देणघेण नसलेले शेकडो अबालवुद्ध सुद्धा आपले प्राण गमावतायत. या युद्धाचे ह्दय पिळवटून टाकणारे अनेक फोटो समोर आलेत. पण इस्रायल आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
अरब देशांबरोबर तिसऱ्या युद्धात इस्रायलच महत्त्वाच उद्दिष्टय साध्य
इस्रायलचा जन्म होण्याआधी आणि त्यानंतरही ज्यू आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आले आहेत. एडॉल्फ हिटलरने, तर ज्यूंना संपवण्यासाठी क्रौर्याची परिसीमा गाठली. ज्यूंवर अत्याचाराच्या अनेक कहाण्या आहेत. स्वतंत्र देश मिळाल्यानंतरही इस्रायलला स्वत:च्या अस्तित्वासाठी वारंवार संघर्ष करावा लागला आहे. 1967 साली अरब-इस्रायलमध्ये तिसरं युद्ध लढलं गेलं. इजिप्तचे नेते इस्रालयच अस्तित्व मिटवण्याची धमकी देत होते. त्यामुळे इस्रायलने इजिप्तवर हल्ला केला. इजिप्त, सीरिया आणि जॉर्डन या तीन देशांनी मिळून इस्रायलचा सामना केला. इस्रायलने हे युद्ध जिंकलं. या युद्धाने मध्य-पूर्वेचा नकाशाच बदलून टाकला. या युद्धात तिन्ही देशांचे मिळून 15 हजार सैनिक मारले गेले. इस्रायलच्या बाजूला 1000 पेक्षा कमी जिवीतहानी झाली. या युद्धात इस्रायलने रणनितीक दृष्टीने महत्त्वाची उद्दिष्ट साध्य केली. 5 लाख पॅलेस्टिनी विस्थापित झाले. इस्रायलने सीरियाकडे असलेल्या गोलान हाइट्स, पूर्व जेरुसलेमसह वेस्ट बँक, सिनाई द्वीप आणि गाझा पट्टीचा भाग ताब्यात घेतला. इस्रायलने याचा फायदा विस्तारासाठी घेतला. वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेमध्ये इस्रालयने ज्यूंची वसाहत बनवली.
इस्रायलशी शांतता करार करणारे पहिले दोन देश कोण?
या युद्धानंतर 6 वर्षांनी 1973 साली पुन्हा इजिप्त आणि सीरियाने एकत्र येऊन इस्रायल विरुद्ध युद्ध लढलं. यावेळी इजिप्तला इस्रायलच्या ताब्यातून सिनाई प्रायद्वीप परत मिळवण्यात यश आलं. 1982 साली इस्रायलने इजिप्तच्या भागावरील आपला ताबा सोडला. पण गाजा पट्टीवर नियंत्रण कायम ठेवलं. 6 वर्षानंतर इजिप्त आणि इस्रायलमध्ये शांतता करार झाला. इस्रायलशी शांतता करार करणार इजिप्त पहिला देश ठरला. त्यानंतर जॉर्डनने सुद्धा असाच शांतता करार केला. त्यांना कळून चुकलं आपण इस्रायल विरुद्ध जिंकू शकत नाही. पण शांततेने, स्वाभिमानाने जगण्यासाठी पॅलेस्टाइनचा संघर्ष अजून सुरु आहे. हमास ही दहशतवादी संघटना याच संघर्षातून जन्माली आली. इस्रायलच्या शेजारचे देश आता शांत झाले असले, तरी इराणकडून आता इस्रायलच्या अस्तित्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न होतोय.
किती पुढचा विचार करतो, ते इस्रायलने दाखवलं
इराणने इस्रायलला अस्थिर करण्यासाठी हमास आणि लेबनानमध्ये हिज्बुल्लाह ही दहशतवादी संघटना उभी केली. आपण थेट युद्ध लढू शकत नाही, म्हणून इराण या दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून इस्रायलशी लढतोय. हमास आणि हिज्बुल्लाहच्या बरोबरीने आता इस्रायलसमोर हुती बंडखोरांच्या रुपाने आणखी एक आव्हान निर्माण झालय. येमेनमध्ये सत्तेवर असलेल्या हुती बंडखोरांनी जवळपास 2000 किलोमीटर अंतरावरुन इस्रायली शहर तेल अवीवर रॉकेट हल्ला केला. या संघटनेला बळकट करण्यामागे सुद्धा इराणच आहे. इराणने या दहशतवादी गटांना आर्थिक पाठबळ देतानाच रॉकेट, मिसाइल, बॉम्ब सारखी युद्धसामग्री सुद्धा पुरवली. मध्य-पूर्वेत हा सगळा खेळ तेलाच्या पैशावर सुरु आहे. पण इस्रायलच्या ताकदीची त्यांना कल्पना नाहीय. नुकतीच इस्रायलने लेबनानमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकी ब्लास्टमधून त्याची कल्पना दिली. इस्रायल हा देश आपल्या शत्रुच्या बाबतीत किती पुढचा विचार करतो, हे त्यातून दिसून आलं.