‘आधार’ आणि ‘ई-आधार’ यामधील नेमका फरक काय? जाणून घ्या फायदे आणि तोटे

आधार आणि ई-आधार हे दोन्ही एकमेकांपूरक असून काळानुसार डिजिटल पर्याय अधिक सोयीचा आणि सुरक्षित ठरत आहे. मात्र, कोणता पर्याय कसा आणि कधी आहे योग्य हे जाणून घेण्यासाठी संपुर्ण लेख एकदा नक्की वाचा...

आधार आणि ई-आधार यामधील नेमका फरक काय? जाणून घ्या फायदे आणि तोटे
aadhar card
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 28, 2025 | 12:55 AM

आजच्या डिजिटल युगात ‘आधार कार्ड’ हे केवळ एक ओळखीचं साधन राहिलेलं नाही, तर ते बँकिंगपासून ते सरकारी योजनांपर्यंत अनेक सेवांचा प्रवेशद्वार बनलं आहे. मात्र अद्याप बरेच लोक ‘आधार कार्ड’ आणि ‘ई-आधार’ यामध्ये गोंधळून जातात. दोन्ही एकच गोष्ट आहे का? की वेगवेगळ्या आहेत? आणि त्यांचा उपयोग, फायदे, तोटे यामध्ये काय फरक आहे? चला, हे सविस्तरपणे समजून घेऊया.

आधार कार्ड आणि ई-आधार म्हणजे काय?

आधार कार्ड ही भारत सरकारने १२ अंकी युनिक आयडी स्वरूपात जारी केलेली एक अधिकृत ओळख आहे. ती एखाद्या व्यक्तीच्या बायोमेट्रिक (जसे की बोटांचे ठसे, डोळ्यांची ओळख) आणि डेमोग्राफिक (उमेदवारी, पत्ता, लिंग इ.) माहितीच्या आधारे दिली जाते. जेव्हा आपण पहिल्यांदा आधार कार्डसाठी नोंदणी करतो, तेव्हा हे कार्ड काही दिवसांनी पोस्टाने आपल्या पत्त्यावर फिजिकल स्वरूपात पाठवले जाते.

तर, ‘ई-आधार’ हे याचेच डिजिटल रूप आहे. ते तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून (https://myaadhaar.uidai.gov.in) किंवा mAadhaar अ‍ॅपमधून पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता. यामध्ये फिजिकल कार्डसारखीच सर्व माहिती असते आणि याला तितकीच कायदेशीर मान्यता आहे.

फिजिकल आधारचे फायदे आणि काही तोटे

फिजिकल आधार कार्ड हे अनेक ठिकाणी त्वरित स्वीकारले जाते. बँक, सिम कार्ड, सरकारी योजनेची नोंदणी यासाठी त्याचा उपयोग करणे सोपे असते. मात्र, हे कार्ड हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता असते. अशावेळी नवीन कार्ड मिळवण्यासाठी थोडीशी झंझट करावी लागते.

ई-आधारच्या वापराचे फायदे

ई-आधार कार्ड हे फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये सहज साठवून ठेवता येतं. त्यामुळे कधीही गरज पडल्यास ते लगेच वापरता येतं. ते हरवण्याची भीती नसते, कारण फक्त पासवर्ड टाकून ते पुन्हा पुन्हा डाउनलोड करता येतं. शिवाय, हे पीडीएफ स्वरूपात असल्याने ईमेलद्वारे पाठवणे, प्रिंट काढणे हे सर्व अगदी सहज शक्य होतं. सरकारी आणि खासगी दोन्ही ठिकाणी याचा उपयोग केला जाऊ शकतो.

ई-आधारचे तोटे

ई-आधार कार्ड वापरण्यासाठी टेक्नॉलॉजीची प्राथमिक माहिती असावी लागते. पासवर्ड लक्षात ठेवावा लागतो आणि पीडीएफ उघडण्यासाठी मोबाईल किंवा संगणक जवळ असावा लागतो. त्यामुळे ग्रामीण किंवा तांत्रिक ज्ञान नसलेल्या व्यक्तींसाठी याचा वापर थोडा अवघड ठरतो.