लढाऊ विमानांनाही असते ‘एक्सपायरी डेट’? किती वर्षे टिकते फायटर जेट, जाणून घ्या

लढाऊ विमानांचीही एक ठरावीक सेवा मुदत असते. ती विमानाची रचना, इंजिन, उड्डाणाचे तास, देखभाल आणि तांत्रिक स्थिती यावर ठरवली जाते. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

लढाऊ विमानांनाही असते एक्सपायरी डेट? किती वर्षे टिकते फायटर जेट, जाणून घ्या
AMCA
Image Credit source: tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 26, 2026 | 2:20 PM

लढाऊ विमाने कितीही अत्याधुनिक आणि मजबूत असली, तरी त्यांचेही एक ठरावीक कार्यात्मक आयुष्य असते. मात्र, विमान किती वर्षे जुने आहे, एवढ्यावरच त्याचे आयुष्य ठरत नाही. विमानाने किती तास उड्डाण केले, त्याची संरचनात्मक स्थिती कशी आहे, वेळोवेळी देखभाल झाली आहे का आणि धातूमध्ये थकवा निर्माण झाला आहे का, यासारख्या अनेक गोष्टी तपासल्या जातात.

या सर्व तपासण्यांच्या आधारे विमान आणखी किती काळ सुरक्षितपणे वापरता येईल, हे ठरवले जाते. त्यामुळे एखादे लढाऊ विमान सेवाकाळाच्या शेवटी पोहोचल्यानंतर त्याचे पुढे काय केले जाते, हे जाणून घेणेही तितकेच रंजक आहे.

लढाऊ विमानांचे सेवा आयुष्य निश्चित असते.

लष्करी विमानांनाही एक ठरावीक सेवा आयुष्य असते. म्हणजेच हे लढाऊ विमान सेवेत किती वर्ष वापरता येईल याची सुद्धा एक मर्यादा असते. तर या लष्करी लढाऊ विमानांची नियमित देखभाल, वेळोवेळी तपासणी आणि आवश्यक तांत्रिक सुधारणा केल्यास आधुनिक लढाऊ विमाने साधारण 30 ते 40 वर्षे सेवेत राहू शकतात. मात्र प्रत्येक विमानाचे आयुष्य सारखे नसते. विमानाचा प्रकार तसेच त्याचा किती आणि कशा पद्धतीने वापर केला जातो, त्यावर किती ताण येतो, यावर त्यांचे वास्तविक आयुष्य अवलंबून असते.

वयापेक्षा उड्डाणाचे तास अधिक महत्त्वाचे ठरतात.

लढाऊ विमानाचे आयुष्य हे त्याने उड्डाण केलेल्या तासांच्या संख्येवर थेट अवलंबून असते. विमानाची रचना आणि चाचणी ही विशिष्ट संख्येच्या उड्डाण तासांचा सामना करण्यासाठी केली जाते. अनेक आधुनिक लढाऊ विमानांचे सुरुवातीचे डिझाइननुसार सेवा आयुष्य अंदाजे 8 हजार उड्डाण तास असते, तथापि हा आकडा प्रत्येक विमानानुसार बदलू शकतो.

लढाऊ विमान 8 हजार तास उडते यावर ते किती वर्षांत पूर्ण होतील हे ठरते

विमान वर्षाला किती तास उडते, यावर त्याचे 8000 उड्डाण तास किती वर्षांत पूर्ण होतील हे ठरते. जर एखादे लढाऊ विमान वर्षाला अंदाजे 150 ते 200 तास उड्डाण करत असेल, तर त्याला 8000 उड्डाण तास पूर्ण करण्यासाठी अंदाजे 40 ते 50 वर्षे लागू शकतात. मात्र केवळ उड्डाण तासांवर विमानाचे आयुष्य ठरत नाही तर त्यांचे नियमित देखभाल, संरचनात्मक तपासणी आणि विमानाची तांत्रिक स्थितीही तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे योग्य देखभाल केली तर काही लष्करी विमाने अपेक्षेपेक्षा जास्त काळ सेवेत राहू शकतात.

धातूचा थकवा म्हणजे काय?

जुने होत जाणाऱ्या लढाऊ विमानांसाठी ‘मेटल फटीग’ म्हणजेच धातूचा थकवा हा मोठा धोका असतो. विमानाचे टेकऑफ, लँडिंग, वेगाने उड्डाण आणि अचानक दिशा बदलताना त्याच्या रचनेवर मोठा ताण येतो. लढाऊ विमानांना युद्धसरावादरम्यान मोठ्या ‘जी-फोर्स’चा सामना करावा लागतो.

अशा प्रकारचा ताण वारंवार आल्याने विमानाच्या धातूच्या भागांमध्ये हळूहळू बारीक भेगा पडू शकतात. सुरुवातीला या भेगा दिसत नसल्या, तरी त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्या वाढून विमानाच्या मजबुतीवर परिणाम करू शकतात. त्यामुळे लढाऊ विमानांची संपूर्ण सेवाकाळात नियमित आणि बारकाईने तपासणी केली जाते.

लढाऊ विमानाचे आयुष्य वाढवता येते का?

विमान जुने झाले म्हणून ते लगेच सेवेतून बाहेर काढले जाते असे नाही. ‘सर्व्हिस लाइफ एक्स्टेंशन’ कार्यक्रमाच्या मदतीने त्याचे आयुष्य आणखी वाढवता येते.

या प्रक्रियेत अभियंते विमानाची सखोल तपासणी करतात. ज्या भागांवर जास्त ताण आलेला असतो, ते भाग बदलले किंवा अधिक मजबूत केले जातात. यासोबतच इंजिन, एव्हियोनिक्स आणि इतर तांत्रिक यंत्रणाही आधुनिक केल्या जातात. त्यामुळे जुने लढाऊ विमान आणखी काही वर्षे सुरक्षितपणे सेवेत ठेवणे शक्य होते.

जेव्हा एखादे लढाऊ विमान सेवेतून निवृत्त होते, तेव्हा काय होते?

जेव्हा एखादे विमान आपली सुरक्षित कार्यकाळ पूर्ण करते, तेव्हा त्याला सक्रिय लष्करी सेवेतून काढून टाकले जाते. सेवानिवृत्ती म्हणजे विमान लगेच भंगारात जाते असे नाही. काही सेवानिवृत्त लढाऊ विमाने त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे संग्रहालये, हवाई तळ किंवा लष्करी स्मारकांमध्ये जतन केली जातात. तसेच यावर अभ्यास करत असलेल्यांना प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्रांमध्ये हे ‍ विमान पाठवले जाते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us