Expiry Date आणि Best Before Date, यात नेमका फरक काय ? तुम्हाला माहीत आहे का ?

‘एक्सपायरी डेट’ आणि ‘बेस्ट बिफोर डेट’ या दोन वेगळ्या संकल्पना असून बऱ्याच लोकांचा त्यात गोंधळ होतो. त्यामुळे कोणतंही उत्पादन खरेदी करताना आणि वापरताना हा फरक लक्षात घेणं अत्यावश्यक आहे. दोन्हींमध्ये नेमका फरक काय, चला जाणून घेऊया,

Expiry Date आणि Best Before Date, यात नेमका फरक काय ? तुम्हाला माहीत आहे का ?
expiry vs best before date date
| Edited By: | Updated on: Jun 19, 2025 | 9:52 AM

खरेदी करताना तुम्ही एखाद्या अन्नपदार्थाच्या किंवा औषधाच्या पॅकेटवर “Expiry Date” किंवा “Best Before Date” असं काहीसं लिहिलेलं पाहिलं असेल. अनेकदा लोक या दोन्ही गोष्टी एकाच अर्थाच्या समजून घेतात. पण खरं पाहिलं तर, या दोन टर्म्सचा अर्थ आणि उपयोग पूर्णपणे वेगळा असतो. या लेखात आपण यामधील स्पष्ट फरक समजून घेणार आहोत.

‘एक्सपायरी डेट’ म्हणजे काय?

एक्सपायरी डेट म्हणजे एखाद्या उत्पादनाचा वापर करण्यासाठी सुरक्षित असलेली शेवटची तारीख. साधारणपणे ही तारीख औषधं, खाद्यपदार्थं आणि सौंदर्यप्रसाधनांच्या पॅकेजिंगवर दिली जाते. एकदा का ही तारीख ओलांडली, की उत्पादन वापरणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. उदाहरणार्थ, एक्सपायरी निघालेली औषधं घेतल्यास साइड इफेक्ट्स होऊ शकतात किंवा एक्सपायरी ब्रेड खाल्ल्यास फंगसमुळे फूड पॉइझनिंग होऊ शकते. त्यामुळे अशी उत्पादने दिलेल्या मुदतीनंतर टाळावीत.

‘बेस्ट बिफोर डेट’ म्हणजे काय?

दुसरीकडे, “बेस्ट बिफोर डेट” ही उत्पादनाच्या गुणवत्ता आणि चव टिकवण्याच्या मुदतीची तारीख असते. ही तारीख अधिकतर स्नॅक्स, पॅकेज्ड फूड्स, ड्राय फ्रूट्स, बिस्किट्स किंवा सौंदर्यप्रसाधनांवर दिलेली असते. या तारखेनंतर उत्पादन खराब झालेलं नसतं, पण त्याची गुणवत्ता, चव, रंग किंवा सुगंधात थोडेसे बदल होऊ शकतात. मात्र, हे उत्पादन योग्य स्थितीत असेल तर ते वापरण्यास अडचण नसते.

‘बेस्ट बिफोर’ नंतरही वापर योग्य का?

होय, बेस्ट बिफोर डेट निघाल्यानंतरही काही उत्पादने योग्य प्रकारे साठवली गेली असल्यास वापरली जाऊ शकतात. उदा. एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवलेले ड्राय फूड्स. पण जर पॅकेट फुगलेले असेल, त्यातून विचित्र वास येत असेल किंवा चव व रंगात बदल झालेला असेल, तर ते टाळणंच योग्य ठरतं.

आरोग्यासाठी काय घ्याल काळजी?

कोणतेही उत्पादन खरेदी करताना त्यावरील लेबल नीट पाहणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एखाद्या उत्पादनाच्या डेटविषयी शंका वाटत असेल, तर ते वापरणं टाळावं. कारण कोणतीही किंमत आरोग्याच्या धोक्यापेक्षा मोठी नसते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)