
बाकी सर्व महिने ३० किंवा ३१ दिवसांचे, पण फेब्रुवारी नेहमी २८ दिवसांचा असतो. आणि दर चार वर्षांनी तो अचानक २९ दिवसांचा होतो. यामागचं कारण काय आहे? जर २९ फेब्रुवारी नसता, तर आपल्या आयुष्यात काय फरक पडला असता? चला, या गोंधळाचे खरे कारण जाणून घेऊया.
आपण सर्वजण मानतो की वर्ष ३६५ दिवसांचं आहे, पण खरंतर पृथ्वी सूर्याभोवती एक पूर्ण चक्कर मारायला ३६५ दिवस आणि ६ तास घेतो. म्हणजेच, आपला कॅलेंडर ३६५ दिवसांवर आधारित असला तरी, पृथ्वीच्या गतीचा थोडा फरक होतो. ह्या अतिरिक्त ६ तासांचा विचार केला तर दर वर्षी ते थोडे थोडे जमा होत जातात. यामुळे चार वर्षांनी त्या ६ तासांचा जमा होणारा वेळ २४ तास होतो, म्हणजेच एक दिवस! जर हा दिवस कॅलेंडरमध्ये घेतला नसता, तर आपल्या कॅलेंडर आणि निसर्गाच्या वेळेतील समंवय हळूहळू गडबडले असते.
तर, कल्पना करा की २९ फेब्रुवारी नसता, तर काय होऊ शकतं? ऋतूंचा अदलाबदल होऊ लागला असता. दोन शतकांनंतर दिवाळीत पाऊस पडत असता, आणि उन्हाळ्यात होळी येत असती. असे घडले असते कारण आपलं कॅलेंडर निसर्गाच्या वेळेच्या मागे लागलं असतं. शेतीच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला असता; पेरणी व कापणीच्या वेळी गडबड झाली असती. सण-उत्सव, सुट्ट्या—सर्वच चुकीच्या वेळी येऊ लागले असते.
अशा गोंधळाला टाळण्यासाठी, आपल्या पूर्वजांनी एक हुशार उपाय शोधला. त्यांनी दर चौथ्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात २९ व्या दिवशी एक अतिरिक्त दिवस घालायचा, जेणेकरून कॅलेंडर पुन्हा निसर्गाच्या वेळेसोबत ‘सिंक’ होईल. या वर्षाला ‘Leap Year’ असे म्हणतात. १५८२ मध्ये पोप ग्रेगरी XIII यांनी ‘Gregorian Calendar’ सुरू केला, जो आजही वापरला जातो. यामुळे कॅलेंडर आणि पृथ्वीच्या गतीमध्ये समंवय राखला गेला आहे.
२९ फेब्रुवारी हा दिवस फक्त कॅलेंडरमधला एक अतिरिक्त दिवस नाही. काही संस्कृतींमध्ये, विशेषतः आयर्लंडमध्ये, या दिवशी मुली मुलांना लग्नाची मागणी घालू शकतात! यावर अनेक कथाही आहेत, आणि काही ठिकाणी ही प्रथा एक खास आणि आनंददायक घटक मानली जाते.