अजितदादांच्या अडचणी वाढणार? विरोधी पक्ष त्या प्रकरणावर आक्रमक, पत्रकार परिषदेत मोठा इशारा
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांकडून विविध मुद्दे उपस्थित करण्यात येत आहेत, दरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनामध्ये विरोधकांकडून विविध मुद्दे उपस्थित करत सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांच्या प्रश्नांना चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान पुण्यातील एका प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमिन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत, मात्र या प्रकरणात आतापर्यंत अद्याप पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये, हा मुद्दा आता विरोधकांनी चांगलाच उचलून धरला आहे. याच मुद्दावर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आता थेट सरकारला इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार?
‘हे बघा जर कुंपणच शेत खात आहे, आणि ते दिसतय. मी काल बोलताना म्हणालो ना खाऊंगा और ना खाने दुंगा, पर जो मिलेगा ओ आधा-आधा बाटके खायेंगे, असा खोचक टोला यावेळी वडेट्टीवार यांनी लगावला आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, प्रश्न उपस्थित करूनही त्यावर उत्तर आलं नाही, मुख्यमंत्री देखील गप्प होते. त्यांनी एक प्रकारे पार्थ पवारांना क्लिनचिटच दिली आहे, आम्ही आता राज्यामध्ये एक स्पर्धा परीक्षा आयोजित करू, महाराष्ट्र लेव्हलची सामान्य ज्ञान स्पर्धा असेल. त्यामध्ये आम्ही मुलांना प्रश्न विचारू अधिक-अधिक खाणारा कुठे जाणार? तसेच अधिक भ्रष्टाचार करणाऱ्यांना संधी कुठे? असा जोरदार हल्लाबोल यावेळी त्यांनी केला आहे. लाज -लज्जा सगळे विसरले असतील तर त्याला काही विलाज नाही. पण हा प्रश्न इथे संपलेला नाहीये. हा प्रश्न आम्ही लावूनच धरलेला आहे, असा इशाराही यावेळी वडेट्टीवार यांनी दिला.
जरी विरोधकांची संख्या कमी असली तरी आमची ताकद कमी झाली असं अजिबात नाही, आम्ही भ्रष्टाचाराचे अनेक विषय मांडले आहेत. पण ज्यांना आता भ्रष्टाचाराची सवय झाली आहे, त्यांच्याकडून उत्तर काय मिळणार? त्यांनी महाराष्ट्र लुटायचं ठरवलंच आहे, विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर मिळतच नाही, मग आता त्यावर तुम्हीच उत्तर शोधा, असं मला वाटतं, भ्रष्टाचार त्यांनी करायचा, घोटाळे त्यांनी करायचे आणि उलट विरोधकांनाच त्यांनी सवाल करायचा की हे प्रश्न तुम्ही अधिवेशनात का मांडले नाहीत? असं हे सर्व सुरू आहे, असा घणाघातही यावेळी वडेट्टीवार यांनी केला आहे.
