अन्नातील भेसळ कशी ओळखाल? FSSAI ने सांगितल्या गूळ, हळद आणि तुपाची शुद्धता तपासण्याच्या सोप्या पद्धती
आपण रोजच्या आहारात अनेक पदार्थांचा वापर करतो. मात्र, बाजारातून आणलेले हे पदार्थ शुद्ध आहेत की त्यामध्ये भेसळ करण्यात आली आहे, याची खात्री अनेकदा आपल्याला नसते. अन्नपदार्थांमधील भेसळ आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अन्नपदार्थ खरेदी करताना आणि वापरताना त्यांची शुद्धता तपासणे महत्त्वाचे आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) नागरिकांना याबाबत जागरूक करण्यासाठी वेळोवेळी काही सोप्या चाचण्यांची माहिती देत असते. गूळ, हळद आणि तुपामधील भेसळ कशी ओळखायची, जाणून घेऊया.

गुळातील भेसळ कशी ओळखाल?
गुळामध्ये बेकिंग सोडा मिसळण्याची शक्यता असते. याची तपासणी करण्यासाठी एका टेस्ट ट्यूबमध्ये पाव चमचा कुस्करलेला गूळ घ्या. त्यामध्ये 3 एमएल HCL अॅसिड मिसळा. या मिश्रणात बुडबुडे तयार होत नसतील, तर गुळात बेकिंग सोडा नसल्याचे सूचित होते. मात्र, बुडबुडे तयार होत असतील, तर भेसळीची शक्यता असू शकते. बेकिंग सोडा अॅसिडच्या संपर्कात आल्यावर कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. त्यामुळे बुडबुडे दिसतात.
View this post on Instagram
हळदीतील कृत्रिम रंग कसा ओळखाल?
हळद अधिक पिवळी दिसावी यासाठी काही वेळा कृत्रिम रंगांचा वापर केला जातो. याची प्राथमिक तपासणी करण्यासाठी एका पारदर्शक ग्लासमध्ये पाणी घ्या. त्यामध्ये थोडी हळद टाका. शुद्ध हळद हळूहळू ग्लासच्या तळाशी जमा होते आणि पाण्याचा रंग हलका पिवळा होतो. मात्र, हळदीमध्ये कृत्रिम रंग मिसळलेला असल्यास पाण्याचा रंग गडद पिवळा होऊ शकतो.
View this post on Instagram
तुपातील भेसळ कशी तपासाल?
तुपाची शुद्धता तपासण्यासाठी टेस्ट ट्यूबमध्ये 1 एमएल वितळलेले तूप घ्या. त्यामध्ये 1 एमएल HCL अॅसिड आणि अर्धा चमचा साखर मिसळा. हे मिश्रण 2 मिनिटे हलवा. शुद्ध तुपाच्या रंगात बदल होत नाही. मात्र, भेसळयुक्त तुपामध्ये अॅसिडच्या थराचा रंग गडद लाल किंवा पिवळा होऊ शकतो.
View this post on Instagram
अन्नपदार्थ वापरताना घ्या काळजी
अन्नपदार्थांमधील भेसळ ओळखण्यासाठी या चाचण्या प्राथमिक मार्गदर्शन देतात. मात्र, घरगुती चाचण्यांवरून पदार्थ पूर्णपणे शुद्ध असल्याचा निष्कर्ष काढता येत नाही. विशेषतः HCL अॅसिडसारखी रसायने धोकादायक असल्याने अशा चाचण्या घरी स्वतः करू नयेत. त्याऐवजी अधिकृत प्रयोगशाळेतून तपासणी करून घेणे योग्य ठरते. त्यामुळे अन्नपदार्थ खरेदी करताना विश्वासार्ह ब्रँड आणि प्रमाणित उत्पादनांना प्राधान्य द्या.