कोणत्या देशाच्या पंतप्रधानांचा मेकअप सर्वाधिक खर्चिक ? आकडा ऐकताच भुवया उंचावतील
इस्रायली पंतप्रधान कार्यालयाच्या आरटीआय अहवालानुसार, पंतप्रधानांच्या हेअरस्टायलिंग, मेकअप आणि प्रतिनिधित्वावर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. करदात्यांच्या पैशांवर होणाऱ्या या प्रचंड खर्चावरून इस्रायलमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

सामान्य माणूस असो कि सेलिब्रिटी प्रत्येक जण आपापल्या इमेजबद्दल सतर्क असतात. मग जगभरातले महत्वाचे नेते तरी त्याला अपवाद कसे ठरतील ? संपूर्ण जगातील महत्वाचे नेते हे त्यांच्या पब्लिक इमेजबद्दल अतिशय सतर्क असतात. आपली सार्वजनिक प्रतिमा चांगली राहावी यासाठी ते विशेष काळजी घेतात. मात्र, त्यांच्या वैयक्तिक देखभालीसाठी सरकारी म्हणजेच करदात्यांच्या पैशातून होणारा खर्च समोर आला की त्यावर चर्चा आणि वाद सुरू होतात. इस्रायलमध्येही सध्या अशाच एका सरकारी खर्चाची चर्चा रंगली आहे. नुकत्याच एका RTI अहवालाला दिलेल्या उत्तरात इस्रायल सरकारने स्वतः ही आकडेवारी जाहीर केली आहे की, पंतप्रधान कार्यालयाने गेल्या काही वर्षांत हेअरस्टायलिंग, मेकअप आणि प्रतिनिधित्वाशी संबंधित सुविधांवर किती खर्च केला आहे. हा आकडा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलास कारण ही रक्कम थोडीथोडकी नव्हे तर खर्चाचा तो आकडा कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.
इस्रायली पंतप्रधानांचं मेकअप बजेट किती?
इस्रायलमधील पंतप्रधान कार्यालयाच्या रेकॉर्डनुसार, जानेवारी 2019 ते ऑगस्ट 2026 या कालावधीत हेअरस्टायलिंग, मेकअप आणि प्रतिनिधित्वाशी संबंधित खर्चावर सुमारे 4.49 कोटी रुपये, म्हणजेच अंदाजे 4 लाख 70 हजार डॉलर खर्च करण्यात आले आहेत. एका कायदेशीर वकिलाने दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराच्या (Freedom of Information) अर्जानंतर ही माहिती सार्वजनिक करण्यात आली. मात्र या संपूर्ण रकमेला केवळ मेकअपचा खर्च म्हणता येणार नाही. अधिकृत कार्यक्रम, प्रतिनिधित्वाशी संबंधित विविध सेवा तसेच हेअरस्टायलिंग आणि मेकअप यांसारख्या खर्चांचाही त्यात मोठा वाटा आहे.
नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नीचा मोठा वाटा
रेकॉर्ड्सनुसार, या कालावधीमध्ये झालेल्या एकूण हेअर व मेकअपच्या खर्चापैकी जवळपास 90 टक्के खर्च हा देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा नेतन्याहू यांच्याशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामागचं एक कारण असं की या कालावधीतील बहुतांश काळ नेतन्याहू हेच इस्रायलचे पंतप्रधान होते.
नेतन्याहू पुन्हा पंतप्रधानपदावर आल्यानंतर या प्रकारच्या खर्चात वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसून आलं. 2023 मध्ये या खर्चाची रक्कम सुमारे 98 लाख रुपये होती. त्यानंतर 2025 मध्ये हा खर्च वाढून जवळपास 1.06 कोटी रुपये झाला. उपलब्ध आकडेवारीनुसार, हा आतापर्यंतचा सर्वाधिक वार्षिक खर्च ठरला आहे.
कोणकोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळातील आहे हा डेटा ?
जाहीर करण्यात आलेल्या रेकॉर्डमध्ये केवळ नेतन्याहू यांच्या कार्यकाळातीलच नव्हे, तर त्यामध्ये माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि येर लॅपिड यांच्या कार्यकाळातील खर्चाची माहितीही समाविष्ट आहे. वेगवेगळ्या सरकारांच्या काळात हेअर, मेकअप आणि प्रतिनिधित्वाशी संबंधित खर्चात चढ-उतार झाल्याचे या आकडेवारीवरून दिसून आलं. मात्र, नेतन्याहू यांच्या सध्याच्या कार्यकाळात हा खर्च तुलनेने अधिक असल्याचे त्यात नमूद करण्यात आलं,
ही आकडेवारी सार्वजनिक झाल्यानंतर इस्रायलमध्ये सरकारी खर्च आणि पारदर्शकतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः देश युद्ध आणि सुरक्षेच्या गंभीर आव्हानांना सामोरा जात असताना, सार्वजनिक निधीचा अशा प्रकारे होणारा वापर योग्य आहे का, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
