रात्री विनातिकीट प्रवासात TC ने पकडले तर घाबरु नका; रेल्वेचा एक नियम वाचून तुम्हाला मिळेल दिलासा
रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे हा गुन्हा असला तरी रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचे काही खास नियम आहेत. टीटीई तुम्हाला रात्री गाडीतून उतरवू शकतो का आणि पकडले गेल्यास नक्की किती दंड भरावा लागतो, याबद्दलची सविस्तर माहिती आणि तुमचे अधिकार येथे वाचा.

रेल्वेने प्रवास करताना अनेकदा घाईगडबडीत आपल्याकडून तिकीट काढायचे राहून जाते. अशा वेळी मनात एकच धास्ती असते, ती म्हणजे टीटीईची (TTE). विनातिकीट प्रवास करणे हा गुन्हा असला तरी, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने काही कडक आणि काही दिलासादायक नियम बनवले आहेत. जर तुम्ही रात्रीच्या प्रवास करत असताना जर तुमच्याकडे तिकीट नसेल आणि टिटीई आला तर मग पंचाईत होते. मग तो आपल्याला ट्रेनमधून खाली उतरवेल अशी भीती अनेकांना वाटत असते. पण या अशावेळी टीटीईने पकडल्यावर नक्की काय होते आणि तुमचे अधिकार काय आहेत, हे समजून घेऊया.
रात्रीच्या वेळी ट्रेनमधून उतरवता येते का?
रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवाशांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. जर एखादा प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडला गेला, तर टीटीई त्याला रात्रीच्या वेळी कोणत्याही निर्जन किंवा असुरक्षित स्टेशनवर उतरवू शकत नाही. प्रवाशाकडे पैसे नसतील तरीही त्याला सुरक्षिततेच्या कारणास्तव पुढच्या मोठ्या स्टेशनपर्यंत (जंक्शन) प्रवास करू दिला जातो. त्या मोठ्या स्टेशनवर आरपीएफ (RPF) तैनात असते, तिथे प्रवाशाला उतरवून पुढील कायदेशीर कारवाई केली जाते.
दंड किती?
रेल्वेच्या नियमांनुसार, जर एखादा प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडला गेला, तर त्याला प्रवासाच्या अंतराचे पूर्ण भाडे आणि किमान २५० रुपये दंड भरावा लागतो. जर प्रवाशाने हेतुपुरस्सर रेल्वेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, तर रेल्वे कायद्याच्या कलम १३७ नुसार खालील कारवाई होऊ शकते. जर तुम्ही दंड भरण्यास नकार दिला, तर रेल्वे पोलीस (RPF) तुम्हाला अटक करू शकतात. तसेच फसवणुकीचा हेतू आढळल्यास १,००० रुपये दंड किंवा ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांमुळे रेल्वेचे मोठे नुकसान होते. केवळ २०२५ मध्ये रेल्वेने अशा प्रवाशांकडून १७८१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
प्रवाशांनी काय करावे?
- ओळखपत्र तपासा: दंड भरण्यापूर्वी संबंधित टीटीईचे अधिकृत ओळखपत्र पाहण्याचा तुम्हाला अधिकार आहे.
- पावतीची मागणी करा: तुम्ही भरलेल्या प्रत्येक रुपयाची अधिकृत पावती टीटीईकडून घ्या. पावती नसेल तर तो दंड अधिकृत मानला जात नाही.
- स्वतःहून माहिती द्या: जर तुम्ही चुकून तिकीटाशिवाय गाडीत चढलात, तर टीटीई तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी स्वतःहून त्यांना जाऊन भेटा आणि तुमची अडचण सांगून तिकीट बनवून घ्या.
- रेल्वे नियम कडक असले तरी ते प्रवाशांच्या हितासाठीच आहेत. त्यामुळे दंड आणि अपमान टाळण्यासाठी नेहमी वैध तिकीट काढूनच प्रवास करा.