
आपल्यासमोर साप फणा काढून उभा राहिला तर आपली बोबडी वळेल. इतकंच काय तर कित्येक दिवस त्या वाटेनं जाणं देखील आपण टाळू. कारण सापाच्या दंशाने काय होऊ शकतं याची जाणीव प्रत्येकाला आहे. काही साप विषारी नसतात पण त्यांना पाहूनही आपला थरकाप उडतो. सर्पमित्रांना सापाचं तसं काही वाटत नाही. पण ज्यांना सापाची भीती वाटते ते अशा ठिकाणी जाणं टाळतात. अनेकांना घराशेजारी झाडं किंवा बाग करण्याची आवड असते. कारण झाडांमुळे वातावरण चांगलं राहतं तसेच थंडावाही राहतो. पण बागेतील काही झाडं तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे अशी झाडं बागेत असतील तर काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात साप त्यांच्या शीतनिद्रेतून जागे होतात आणि अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. अशा स्थितीत त्यांना काही झाडं आणि वनस्पती आकर्षित करतात. आज आपण अशाच झाडांबाबत जाणून घेणार आहोत.
उंच गवत आणि झुडपं सापांना आकर्षित करतात. कारण साप आरामात या गवतात लपू शकतात. तसेच अन्नासाठी आवश्यक कीटक आणि इतर भक्ष्यही या ठिकाणी सहज मिळतं. काटेरी झुडुपांमध्ये जास्त प्रमाणात साप आढळतात. कारण या ठिकाणी किटकांचा वावर जास्त असतो. त्यामुळे अन्नासाठी फार काही भटकंती करावी लागत नाही. तसेच सापांना या ठिकाणी सुरक्षित वाटतं. इतकंच काय तर झुडुपांमध्ये सापांना थंडावा मिळतो. त्यात साप आरामात राहू शकतात. त्यामुळे झाडाझुडपं आणि वाढलेल्या गवतांमध्ये काम करताना काळजी घेणं गरजेचं आहे.
फुलांची झाडं देखील किटकांना आकर्षित करतात. त्यामुळे या ठिकाणी बेडकं आपलं भक्ष्य शोधण्यासाठी येतात. बेडूक हा तर सापाचं आवडतं खाद्य.. मग अशी ठिकाणं सापाला आकर्षित करतात. अनेकदा बाग करताना त्या ठिकाणी दगडं रचली जातात. अशी ठिकाणं सापांना आकर्षित करताना सापांना ही जागा उबदार ठरते. तसेच लपण्यासाठी सहज खाचे मिळतात. त्यामुळे साप अशा ठिकाणी वावर करतात.
दुसरीकडे, साप काही वनस्पतींपासून दूर राहणं पसंत करतात. धनंतर नावाचं वनस्पती सापांना दूर करते. झाडाच्या पानाच्या तीव्र गंध सापांना आवडत नाही. सर्पगंधा, वर्मवूड, झेंडुच्या फुलांचे रोप, निवडुंग, स्नेक प्लांटमुळेही साप पळून जातात.