ना वीज, ना मोबाईल, ना इंटरनेट! भारतातील हे गाव जगतंय शेकडो वर्षांपूर्वीचं आयुष्य

ना मोबाईल, ना इंटरनेट, विजेशिवाय जगणारं भारतातील अनोखं गाव; 17 कुटुंबांनी निवडली निसर्गाच्या सान्निध्यातील जीवनशैली. कसं करतात स्वत: मनोरंजन. ऐकून तुम्ही व्हाल चकित.

ना वीज, ना मोबाईल, ना इंटरनेट! भारतातील हे गाव जगतंय शेकडो वर्षांपूर्वीचं आयुष्य
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 06, 2026 | 5:30 PM

सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि वीज यांच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करणं अनेकांना कठीण वाटतं. मात्र, आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील एंथकापल्लीच्या डोंगररांगांमध्ये असलेलं कुर्मा ग्रामम हे गाव आधुनिक सुखसोयी यांच्यापासून दूर राहत वेगळीच जीवनशैली जगत असल्याचा दावा सोशल मीडियावरील व्हिडिओंमधून केला जात आहे.

सुमारे 60 एकर परिसरात पसरलेल्या या गावात केवळ 17 कुटुंबे राहत असल्याचं सांगितलं जातं. मात्र, सध्या आपण बघितलं प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीजवळ स्मार्टफोन वापरणारे लोक तुम्हाला दिसतील पण या गावात स्मार्टफोन, इंटरनेट किंवा डिश अँटेना तुम्हाला शोधून देखील सापडणार नाही. या गावात सध्याच्या गावांप्रमाणे रात्री लाईट नाही तर विजेच्या दिव्यांऐवजी अरंडीच्या तेलाचे दिवे लावून घरं आणि परिसर उजळवला जातो. फक्त 17 कुटुंब असणारे हे गाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

गावात प्रत्येकजण करतो नैसर्गिक वस्तूंचा वापर

या गावातील घरांची रचनाही पारंपरिक पद्धतीची आहे. माती, चुना, लाकूड आणि दगड यांसारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून घरं तयार केली जातात. घरांच्या जमिनीवर शेणाने सारवण केलं जातं. स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरऐवजी मातीच्या चुली आणि लाकूड वापरलं जातं. तसेच साबणाऐवजी रीठ्यासारख्या नैसर्गिक वस्तूंचा वापर केला जात असल्याचंही सांगितलं जातं.

गावातील दिनचर्याही आधुनिक जीवनापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. सोशल मीडिया माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास ग्रामस्थ उठतात. स्नान आणि दैनंदिन कामं आटोपल्यानंतर सर्वजण एकत्र येऊन भजन, ध्यान आणि आध्यात्मिक साधना करतात.

शिक्षण देखील वेगळ्या पद्धतीचे

मुलांच्या शिक्षणासाठीही पारंपरिक पद्धतीला प्राधान्य दिलं जातं. आधुनिक शाळांऐवजी गुरुकुल पद्धतीने वेद, रामायण, भगवद्गीता यांसोबतच मूलभूत इंग्रजी आणि गणिताचं शिक्षण दिलं जात असल्याचं सांगितलं जातं.

2018 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमामागे निसर्गाच्या जवळ राहणं, आधुनिक जीवनातील ताणतणावापासून दूर जाणं आणि साधं, स्वावलंबी जीवन जगणं हा उद्देश असल्याचं सांगितलं जातं. डिजिटल युगातही अशा प्रकारे पारंपरिक जीवनशैली जपणारं हे गाव सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us