जॉब इंटरव्ह्यूमध्ये करू नका ‘या’ 5 चुका, नाहीतर नोकरी सुटण्याची शक्यता वाढेल!
जॉब इंटरव्ह्यू हा प्रत्येक नोकरीसाठी सिलेक्ट होण्यासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे आम्ही सांगितलेल्या या चुका टाळल्या, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

जॉब इंटरव्ह्यू हा प्रत्येकाच्या करिअरमध्ये एक महत्त्वाचा टप्पा असतो. हेच ते क्षण असतात जे तुमचं प्रोफेशनल भविष्य घडवू शकतात. पण काही वेळा आपण अनावधानाने अशा चुका करतो, ज्या आपल्याला नोकरीपासून वंचित ठेवू शकतात. जरी तुमचं रिज्युमे चांगलं असेल, तरी इंटरव्ह्यू दरम्यान काही गोष्टींकडे लक्ष न दिल्यास संधी हातून जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया अशा ५ चुकांबद्दल, ज्या कुठल्याही मुलाखतीदरम्यान टाळायला हव्यात.
1. पूर्वतयारी
बऱ्याच वेळा उमेदवार असा समज करतात की, त्यांचं CV आणि अनुभव पुरेसा आहे, पण इंटरव्ह्यूमध्ये केवळ तेच पाहिलं जात नाही. कंपनीबद्दल, त्या पदाच्या जबाबदाऱ्या आणि संभाव्य प्रश्नांची तयारी करणे अत्यावश्यक असते. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, त्यांच्या उत्पादनांबद्दल माहिती, मिशन-व्हिजन जाणून घेणं गरजेचं आहे.
“आपल्याबद्दल सांगा”, “तुमच्या कमकुवत बाजू कोणत्या?” अशा प्रश्नांची उत्तरं पूर्वीच तयार ठेवावीत. सिच्युएशनल प्रश्नांचीही सराव करणे फायद्याचे ठरते.
2. वेळेचे नियोजन
टाइम मॅनेजमेंट ही कोणत्याही व्यावसायिकाची महत्त्वाची कौशल्य असते. इंटरव्ह्यूला उशिरा पोहोचणं तुमच्याविषयी नकारात्मक प्रतिमा निर्माण करू शकते. इंटरव्ह्यूच्या ठिकाणाचा पत्ता आधीच तपासा, ट्रॅफिक किंवा अन्य अडथळे विचारात घेऊन किमान 15-20 मिनिटे आधी पोहोचण्याचा प्रयत्न करा. जर काही अपरिहार्य कारणामुळे उशीर होणार असेल, तर संबंधित व्यक्तीला फोनवरून माहिती द्या.
3. अयोग्य ड्रेस कोड
तुमचा ड्रेस हा तुमच्या प्रोफेशनल दृष्टिकोनाचं प्रतिक असतं. काहीजण इंटरव्ह्यूला अगदी कॅज्युअल कपड्यांमध्ये जातात, जे चुकीचं आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील मुलाखतींसाठी पुरुषांनी शर्ट-पॅंट, सूट आणि महिलांनी साडी, फॉर्मल सूट घालनेच योग्य ठरते. तसेच क्रिएटिव्ह फिल्डमध्ये स्मार्ट कॅज्युअल स्वीकार्य असला तरी, तुमचं व्यक्तिमत्व प्रोफेशनल आणि नीटनेटके दिसायला हवं.
4. नकारात्मक बोलणं
पूर्वीच्या नोकरीबद्दल किंवा वरिष्ठांबद्दल तक्रार करणं टाळा. यामुळे तुमची नकारात्मक प्रतिमा तयार होते. काम बदलण्यामागे सकारात्मक कारणं सांगा. उदाहरणार्थ, “मी नवीन आव्हानं शोधत होतो”. अशा कठीण प्रश्नांना नीट, डिप्लोमॅटिक पद्धतीने उत्तर द्या.
5. फक्त पगारावर लक्ष केंद्रीत करणे:
अनेक उमेदवार इंटरव्ह्यूच्या सुरुवातीलाच पगार आणि फायदे विचारतात, जे व्यावसायिक दृष्टिकोनातून चुकीचं आहे. आधी तुमच्या कौशल्यांवर आणि तुमचं मूल्य काय आहे हे प्रामाणिकपणे मांडलं पाहिजे. पगाराबाबत चर्चा तेव्हाच करा जेव्हा विचारले जाईल.
