
भारत आपला स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्टला साजरा करतो, तर पाकिस्तान आपला स्वातंत्र्यदिन 14 ऑगस्टला साजरा करतो. भारतीय स्वातंत्र्य अधिनियम, 1947 नुसार भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाले. मग प्रश्न असा पडतो की, एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पाकिस्तान आपला स्वातंत्र्यदिन 14 ऑगस्टला का साजरा करतो? यामागचं खरं कारण जाणून घेऊया.
सुरुवातीला दोन्ही देशांचा स्वातंत्र्यदिन कधी होता ?
‘फर्स्टपोस्ट’ (Firstpost) च्या एका अहवालानुसार, 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट हाच होता. पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिन्ना यांनी एका ऐतिहासिक रेडिओ भाषणात 15 ऑगस्टला स्वतंत्र आणि सार्वभौम पाकिस्तानचा जन्मदिन म्हटले होते.
पाकच्या एका वृत्तपत्रानुसार, पाक मंत्रिमंडळाने आणि जिन्ना यांनी 15 ऑगस्ट 1947 च्या सकाळीच शपथ घेतली होती.
जुलै 1948 मध्ये जेव्हा पाकिस्तानचे पहिले टपाल तिकीट (Postage Stamp) जारी झाले, तेव्हा त्यावरही 15 ऑगस्ट 1947 हाच त्यांचा स्वातंत्र्यदिन नमूद केला होता.
तारीख बदलण्याचे कारण काय?
15 ऑगस्टच्या मध्यरात्री लॉर्ड माउंटबॅटन यांना भारत आणि पाकिस्तानला सत्ता सोपवायची होती. पण ब्रिटिश राज्याचे ते एकमेव प्रतिनिधी असल्यामुळे दोन्ही ठिकाणी एकाच वेळी उपस्थित राहणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी 14 ऑगस्टला कराचीमध्ये पाकिस्तानला सत्ता हस्तांतरित केली आणि नंतर दिल्लीला पोहोचले. पण याचा अर्थ असा नाही की पाकिस्तानला 14 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले. कारण स्वातंत्र्य अधिनियमात दोन वेगवेगळ्या तारखांचा कोणताही उल्लेख नव्हता.
1948 मध्ये पाकिस्तानने आपला स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्टऐवजी 14 ऑगस्टला साजरा करायला सुरुवात केली. पाकिस्तानमधील एका मोठ्या वर्गाला आपला स्वातंत्र्यदिन भारतासोबत साजरा करायचा नव्हता. यावर तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली खान यांनी मंत्र्यांची बैठक बोलावली आणि स्वातंत्र्यदिन वेगळा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा जिन्ना यांनीही 14 ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन करण्याची परवानगी दिली.
अशा प्रकारे, एका राजकीय निर्णयामुळे दोन्ही देशांचे स्वातंत्र्यदिन वेगवेगळे झाले. दोन्ही देशांनी एकाच कायद्यानुसार स्वातंत्र्य मिळवले असले, तरी आज त्यांची ओळख आणि इतिहास वेगवेगळा आहे.