Snake Venom : साप चावल्यावर घोडा वाचवतो माणसाचा जीव, पण कसं शक्य आहे? वाचा A टू Z
अँटीबॉडीचे प्रमाण योग्य पातळीवर पोहोचल्यानंतर पशुवैद्यकीय देखरेखीखाली घोड्याकडून प्लाझ्मा घेतला जातो. अँटीव्हेनमसाठी आवश्यक अँटीबॉडी प्लाझ्मामध्ये असतात.

Snake Venom : साप म्हटलं की सर्वांनाच भीती वाटते. साप चावल्यावर त्याच्या विषाने आपला मृत्यू होतो की काय? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. बरेच साप बिनविषारी असतात. परंतु काही साप हे अतिशय विषारी असून त्यांनी दंश करताच आपला मृत्यू होता. दरम्यान, हाच मृत्यू होऊ नये यासाठी संशोधकांनी अँटीव्हेनम तयार केलेले आहे. सापाच्या विषापासून मानवाचा बचाव व्हावा यासाठी हे औषध वापरले जाते. हेच औषध तयार करताना घोड्याचा वापर केला जातो. हा वापर नेमका कसा केला जातो? ते सविस्तर जाणून घेऊ या…
अँटीव्हेनम तयार करण्याची प्रक्रिया कशी असते?
अँटीव्हेनम तयार करण्यामध्ये घोड्यांची महत्त्वाची भूमिका असते. सर्वप्रथम विषारी सापांकडून विष संकलित केले जाते. या प्रक्रियेला ‘मिल्किंग’ म्हणतात. भारतात रसेल्स वायपर, सॉ-स्केल्ड वायपर, स्पेक्टॅकल्ड कोब्रा आणि कॉमन क्रेट या ‘बिग फोर’ सापांच्या विषावर विशेष लक्ष दिले जाते. भारतातील गंभीर आणि जीवघेण्या सर्पदंशाच्या घटनांमध्ये या सापांचा मोठा वाटा आहे.
संकलित केलेले विष नियंत्रित वातावरणात सुरक्षितपणे प्रक्रिया करून ठेवले जाते. कारण त्यातील महत्त्वाचे विषारी घटक पुढील प्रक्रियेसाठी फार महत्त्वाचे असतात. या प्रक्रियेत सापाच्या विषाच्या रचनेचा अभ्यासही केला जातो. कारण वेगवेगळ्या प्रजातींच्या तसेच एकाच प्रजातीच्या वेगवेगळ्या भागातील सापांच्या विषामध्येही फरक असू शकतो.
अँटीव्हेनमसाठी घोड्यांचीच निवड का?
घोडे मोठ्या आकाराचे प्राणी असल्याने त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार होऊ शकतात. अँटीव्हेनम निर्मितीसाठी निवड करण्यापूर्वी घोड्यांची पशुवैद्यकीय तपासणी केली जाते. त्यांना क्वारंटाईन केले जाते. पूर्णपणे निरोगी आणि आवश्यक वैद्यकीय निकष पूर्ण करणाऱ्या घोड्यांचीच यासाठी निवड केली जाते. त्यानंतर संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवले जाते.
घोड्याच्या शरीरात सापाचे विष कसे टाकले जाते?
घोड्याला विष अतिशय कमी प्रमाणात दिले जाते. ते सहसा अॅडजुव्हंटसोबत तयार केले जाते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक प्रतिक्रिया वाढण्यास मदत होते. सुरुवातीची मात्रा कमी असते. त्यानंतर प्रोटोकॉलनुसार हळूहळू बूस्टर डोस दिले जातात.
घोड्याची रोगप्रतिकारक शक्ती विषातील प्रथिनांना बाहेरील घटक म्हणून ओळखते आणि त्यांच्याविरोधात अँटीबॉडी तयार करते. ही प्रक्रिया अनेक वेळा केल्यानंतर घोड्याच्या रक्तातील अँटीबॉडीचे प्रमाण अँटीव्हेनम निर्मितीसाठी वाढते.
घोड्याच्या रक्तातून अँटीव्हेनम कसे तयार होते?
अँटीबॉडीचे प्रमाण योग्य पातळीवर पोहोचल्यानंतर पशुवैद्यकीय देखरेखीखाली घोड्याकडून प्लाझ्मा घेतला जातो. अँटीव्हेनमसाठी आवश्यक अँटीबॉडी प्लाझ्मामध्ये असतात. घोड्याच्या प्लाझ्मामध्ये आवश्यक अँटीबॉडी असल्या तरी तो थेट सर्पदंश झालेल्या व्यक्तीला देता येत नाही. म्हणूनच प्लाझ्मावर विशेष प्रक्रिया करून अँटीबॉडी शुद्ध केल्या जातात. अशा प्रकारे तयार झालेले अँटीव्हेनम सापाच्या विषामुळे होणारा धोका कमी करण्यासाठी रुग्णांच्या उपचारात वापरले जाते.