शिवसेना कोणाची? कोर्टात शिंदे गटापुढे दोन मोठ्या अडचणी, तीन मंत्र्यांचे नाव घेत असीम सरोदेंनी थेट कायदा सांगितला
Shiv Sena Party Symbol Hearing : शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू आहे. आज 22 सप्टेंबरला सुनावणी होणार होती, मात्र या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील तारीख जाहीर केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता वकिल असीम सरोदे यांनी शिंदे गटासमोरील कायदेशीर आणि कागदोपत्री अडचणींबद्दल माहिती दिली आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी आज होती. पण कोर्टाकडून ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. संबंधित प्राधिकरणाकडून लवकरच या सुनावणीसाठी नवी तारीख जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीकडे लक्ष लागलेल्या अनेकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण त्याआधी आता वकिल असीम सरोदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे? ते जाणून घेऊयात.
“शिंदेंच्या गटाची मोठी अडचण होणार आहे. कारण असत्य सांगायला वेळ कितीही दिला तरी वेळ कमी पडतो. असत्य घोटून घोटून त्यांना सुप्रीम कोर्टासमोर मांडावं लागणार, त्यामुळे वेळ लागणार. एक मोठी अडचण आहे. त्याशिवाय दुसरी एक कागदपत्रांची अडचण आहे. जसं मी सातत्याने सांगतोय की जेव्हा हे सगळे आमदार पळून गेले होते. तर जे पळून गेले नव्हते ते आमदार, उदय सामंत, संजय राठोड, दादा भूसे यांच्या सहीने असलेल्या ठरावावर एकनाथ शिंदे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. मग त्यांनी त्यांच्या सह्या कधी नाकारल्यात का? तर कधीही नाकारल्या नाहीत.”, असं सरोदेंनी सांगितलं.
पुढे बोलताना सरोदेंनी सांगितलं, “उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे यांनीही कधीही सांगितलं नाही की ही आपली सही नाहीये. त्यामुळे हा कागदोपत्री पुरावा हा अत्ंयत सज्जड पुरावा आहे. ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एकनाथ शिंदे यांना निलंबित करताना एक सूचक आणि एक अनुमोदक म्हणून हेच लोक होते. आता ही गोष्ट अडचण ठरणार आहे.”
“एकनाथ शिंदे स्वतः कार्यकारणीच्या मिटिंगमध्ये होते. त्यांनी पक्ष घटनेमध्ये विस्तार केलेला तेव्हा त्यावर सही केलेली आहे. शिंदेंची सही असलेले कागदपत्रं कोर्टासमोर मांडलेले आहेत. हे सर्व मग तुम्ही कसे नाकारणार आहात? हे सर्व कागदपत्र मुख्य निवडणूक आयोगाने बघितलेच नाहीत हाच मुख्य वाद आहे. उद्धव ठाकरेंकडून सांगितला जाणारा हा वाद खोटा आहे, असं सांगणं अडचणीचं होणार आहे”, असंही सरोदे यांनी सांगितलं आहे.
