
विमान अपघाताची एखादी बातमी ऐकली की आपल्याला भीती, धास्ती तर वाटतेच पण त्यासोबतच मनात अनेक प्रश्न येतात. नुकत्याच अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताने पुन्हा एकदा या प्रश्नांनी डोकं वर काढलं आहे. अनेकांना वाटतं की, जर विमानात प्रत्येक प्रवाशाकडे पॅराशूट असतं, तर कदाचित अनेकांचे जीव वाचू शकले असते. ही गोष्ट बोलायला जेवढी सोपी वाटते, प्रत्यक्षात मात्र तेवढं सोपं नाही. विमान कंपन्या किंवा हवाई वाहतूक नियम प्रवाशांना पॅराशूट का देत नाहीत, यामागे काही ठोस आणि व्यावहारिक कारणं आहेत.
वजन आणि जागेची समस्या
विमान वाहतूक तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक प्रवाशाला पॅराशूट न देण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पॅराशूटचं वजन आणि ते ठेवण्यासाठी लागणारी जागा. एक पॅराशूट फक्त एक बॅग नसते, तर त्यासोबत हेल्मेट, गॉगल आणि इतर काही उपकरणंही लागतात. जर विमानाच्या प्रत्येक सीटवर पॅराशूट आणि ही सगळी उपकरणं ठेवली, तर विमानाचं एकूण वजन हजारो किलोग्रॅमने वाढेल! यामुळे विमानाला जास्त इंधन लागेल आणि तिकिटाचे दरही खूप वाढतील. शिवाय, प्रत्येक प्रवाशासाठी एवढं सामान ठेवायला विमानात पुरेशी जागाही नसते.
विमानाची उंची आणि हवेचा दाब
साधारणपणे पॅराशूटने उडी मारणारे लोक १५,००० ते १९,००० फूट उंचीवरून उडी मारतात. पण प्रवासी विमानं ही ३०,००० ते ३५,००० फूट किंवा त्याहूनही जास्त उंचीवर उडतात. इतक्या उंचीवर हवा खूप विरळ असते आणि ऑक्सिजनची पातळी खूप कमी असते. अशा परिस्थितीत, पॅराशूटने उडी मारल्यास प्रवाशांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, ते थंडीने गारठू शकतात किंवा उंचीमुळे होणाऱ्या इतर शारीरिक समस्यांना बळी पडू शकतात, ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
प्रशिक्षणाचा अभाव
पॅराशूटने सुरक्षितपणे उडी मारण्यासाठी आणि ते योग्य प्रकारे वापरण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असते. पॅराशूट कसं बांधायचं, विमानातून उडी कशी मारायची, हवेत स्वतःला कसं सांभाळायचं आणि जमिनीवर सुरक्षित कसं उतरायचं, या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. प्रवासी विमानात सामान्य नागरिक प्रवास करत असतात, ज्यांना असं कोणतंही प्रशिक्षण मिळालेलं नसतं. चुकीच्या पद्धतीने पॅराशूट वापरल्यास किंवा उडी मारल्यास मोठा अपघात होऊ शकतो.
वेळेचा अभाव आणि गोंधळ
विमान अपघातासारख्या अत्यंत तणावपूर्ण आणि धोकादायक परिस्थितीत, प्रवाशांकडे पॅराशूट व्यवस्थित घालण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी खूप कमी वेळ असतो. अशावेळी गोंधळ उडण्याची शक्यता जास्त असते. इतक्या कमी वेळात, घाबरलेल्या अवस्थेत, शेकडो प्रवाशांनी पॅराशूट घालून विमानाच्या एका मर्यादित दरवाजातून रांगेत बाहेर पडणं हे जवळपास अशक्य आहे. विमानात आधीच पॅराशूट घालून बसणंही व्यावहारिक नाही.
विमानाचं डिझाइन
प्रवासी विमानांचे दरवाजे हे पॅराशूट घालून उडी मारण्यासाठी डिझाइन केलेले नसतात. विमानाच्या वेगामुळे आणि रचनेमुळे, दरवाजातून बाहेर पडताना प्रवासी विमानालाच धडकण्याची किंवा पंख्यांमध्ये अडकण्याची शक्यता असते.